श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गणेश सहकारी साखर कारखाना तसेच खासदारकीला झालेल्या पराभवामुळे ते घाबरलेले आहेत. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे त्यांनी जास्तीचे पैसे सभासदांना दिले, अशी घाणाघाती टिप्पणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली. अशोक कारखान्याची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होऊन पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ऊस भावासंदर्भात अनेक सभासदांनी प्रवरा, संगमनेरचे उदाहरण देत 300 ते 500 रुपये देवून दिवाळी गोड करण्याचे आवाहन केले होते. हाच धागा पकडत मुरकुटे यांनी प्रवरा कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढत, प्रवरेची खरी परिस्थिती माहिती नसताना तुलना कशासाठी करता, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या प्रवरेला 2020-21 मध्ये 170 कोटी तोटा होता, तोच कारखाना 2021-22 मध्ये 30 कोटी नफ्यात कसा आला. साखर कारखान्याला एका वर्षात 200 कोटी नफा कसा होऊ शकतो. ते महसूलमंत्री काहीही करू शकतात. त्यांचा काटा तपासायला कोण जाणार, कोणता अधिकारी हिम्मत करेल. प्रवरेत गॅमन कंपनीचा को-जनरेशन प्रकल्प होता. मात्र, ही कंपनी दिवाळखोरीत आल्याने सेंट्रल बँकेकडून लिलावात प्रवरेने हा प्रकल्प विकत घेतला. त्याचे कर्ज प्रवरा बँकेकडे वळविले. त्यानंतर जिल्हा बँकेकडून 70 कोटींचे कर्ज घेतले. त्यातून ही पतपैशाची उधळपट्टी सुरू आहे. सत्ता असल्यानंतर ते काहीही करतात. त्यामुळे प्रवरा काही आदर्श कारखाना नाही.
संजीवनी, कोळपेवाडी व संगमनेर हे दारू तयार करणारे कारखाने असल्याने ऊसभावाशी त्यांची बरोबरी आम्ही करू शकत नाही. तुम्हाला तुलनाच करायची असेल तर मुळा, ज्ञानेश्वर बरोबर करा. आपल्याप्रमाणेच त्यांच्याही कार्यक्षेत्रात ऊस आहे. साखरेच्या उत्पादनात नुकसान आहे. मात्र, दारूपासून जास्त पैसे मिळत असल्याने ते कधीही जादा भाव देऊ शकतात. शिक्षण संस्थेविषयी वंदना मुरकुटे यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, गोविंदराव आदिक, राधाकृष्ण विखे यांनी कारखान्याच्या असलेल्या शिक्षण संस्था आपल्या स्वकीयांच्या व स्वतःच्या नावावर करून घेतल्या. आपण मात्र, तसे केले नसून आपल्या संस्था ह्या कारखान्याच्याच मालकीच्या आहेत. त्यामुळे त्यावर झालेला खर्च हा कर्ज नाही. त्यांना जागा व इमारत बांधून देतो, त्यावर मालकी हक्क मात्र कारखान्याचा असल्याने त्यांना जागा देण्यास विरोध असण्याचे कारण नाही. उसाला भाववाढ मिळावी, तोड वेळेवर व्हावी, कामगारांचे पगार व बोनस वेळेवर अदा केले जावे, अशी मागणी डॉ. वंदना मुरकुटे यांनी यावेळी केली.