श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
संपूर्ण देशात आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. श्रीरामपूर बंद ठेवणारे हे कोण? असा सवाल माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी करून
शहर बंद ठेवणे चुकीचे असून या बंदला आपला पूर्ण विरोध आहे. त्यामुळे ज्यांना दुकाने उघडी ठेवायची त्यांनी उघडी ठेवावीत. काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच काही तरुण व्यावसायिकांनीही आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केल्याने रविवारपासून पुकारलेल्या श्राीरामपूर लॉकडाऊनच्या निर्णयात मतभेदाचा खडा पडला आहे.
यासंदर्भात श्री.मुरकुटे यांनी सांगितले की, लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणार्यांचे खूप हाल झाले. आता कुठे बाजारपेठ सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेणे चुकीचे आहे. लॉकडाऊन ठेवून काही उपयोग होणार नाही.
माझ्या घरात 5 जण बाधित होते. मला कुठे काय झाले? जे नियम पाळणार नाहीत त्यांना बाधा होणार, पोलीसही आता कंटाळलेले आहेत. इतक्या दिवसांत लोकांना करोना साथीचे गांभीर्य कळालेले आहे. त्यामुळे ज्यांना हिंडायचे ते हिंडणारच आहे. बंद करुन उपयोग नाही. केंद्र आणि राज्य अनलॉक करत आहे.
मात्र येथे श्रीरामपूर बंद करा ठरवणारे हे कोण? अनेक लोकांचे हातावर पोट आहे. गोरगरीब व्यावसायिकांना पुन्हा बंद ठेवणे परवडणारे नाही. ज्यांच्याकडे भरपूर आहे ते वर्षभर घरात बसतील. गोरगरीबांनी काय भीक मागायची काय? त्यांना पोट भरु द्या, ज्यांना भिती वाटते त्यांनी घरीच बसा, अशा शब्दांत श्री.मुरकुटे यांनी श्रीरामपूर लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.
या बंदमध्ये सामील होऊ नका. सर्व नियम पाळून व योग्य काळजी घेवून दुकाने चालू ठेवा. अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असेही श्री.मुरकुटे म्हणाले.
दरम्यान काही तरूण व्यावसायिकांनीही या बंद बाबत आपली भूमिका मांडली. किरोनामुळे गेली चार महिने पूर्ण उद्योग व्यवसाय बंद होती त्यामुळे लहान व मध्यम व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. सध्या सगळ्याच व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ती पूर्वपदावर येण्यास अजून सहा ते सात महिने जाणार आहेत.
तरीही अजून लॉकडाऊनच्या खड्ड्यात टाकून आणखी व्यावसायिकांना आर्थिक जाळात लोटण्याचा हा प्रकार आहे. ज्यांची दुकाने नाहीत, ज्यांचे उद्योग नाहीत अशा लोकांनी यात पुढाकार घेतला आहे. यात या व्यावसायिकांची बाजू कोण लक्षात घेणार? हा निर्णय आम्हाला मान्य नसून या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. आम्ही आमची दुकाने उघडी ठेवणार असल्याचे म्हटलेे आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व नियमांचे पालन करुन तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे. उगाचच लॉकडाऊन करुन या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटात टाकू नये. आमचा या लॉकडाऊनला विरोध आहे.
आम्ही आमची दुकाने सुरुच ठेवणार आहोत. आम्हाला कोणीही दुकाने बंद करण्याचा आग्रह करु नये असा इशारा छोटे व्यावसायिक मनोज रमेश दिवे, सागर कांबळे, ऋषभ संचेती, रवींद कणगरे, सागर काळदंते, रिंकू चावला, श्रीराम फरगडे, बाळासाहेब कांबळे, संदिप सोनवणे यांनी दिला आहे.
माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेविका भारती कांबळे, समाजसेवक बाबा सोनवणे यांनीही हातार पोट असणार्या व्यावसायिकांची बाजू मांडून या बंदला विरोध दर्शविला आहे.