Sunday, May 26, 2024
Homeनगरभेंड्यात उद्यापासून चार दिवस जनता कर्फ्यू

भेंड्यात उद्यापासून चार दिवस जनता कर्फ्यू

भेंडा|वार्ताहर|Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीने करोना संसर्गापासून जनतेला दूर ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून दि. 15 ते 18 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत जनता कर्फ्यू पाळून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या चार दिवसांमध्ये नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडल्यास, तोंडाला मास्क न लावता सार्वजिनिक ठिकाणी फिरल्यास किंवा थुंकल्यास 500 रुपये दंड केला जाणार आहे.

नेवासा तालुक्यातील अनेक गावांत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भेंडा बुद्रुक हे लोकसंख्या, व्यापारी आणि औद्योगिकदृष्टया मोठ्या गर्दीचे गाव आहे. याठिकाणी बाहेरील तालुके व गावातून अनेक व्यापारी, फेरीवाले, फळ-भाजीपाला विक्रेते आणि खरेदीदार येत असतात.

कोण कोठून येईल आणि गावाला करोना संसर्ग देऊन जाईल याची शाश्वती राहिली नसल्याने संसर्ग झाल्यावर गाव बंद करण्यापेक्षा संसर्ग होऊ नये साठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांच्या अध्यक्षतेखाली करोना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत खबरदारी म्हणून चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवार 15 ते शनिवार 18 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत दवाखाने-मेडिकल, बँक वगळता सर्व दुकाने, व्यवहार बंद राहतील. नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवल्यास तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास किंवा थुंकल्यास 500 रुपये दंड केला जाणार आहे. 24 तासांत दंड न भरल्यास त्यांची नावे पोलिसांना देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ, डॉ. शिवाजी शिंदे, अंबादास गोंडे, उपसरपंच संतोष मिसाळ, कामगार तलाठी विजय जाधव, ग्रामविकास अधिकारी रेवणनाथ भिसे, बाळासाहेब वाघडकर, रामचंद्र गंगावणे, रोहिदास आढागळे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या