Monday, May 27, 2024
Homeनगरफिर्याद देण्यासाठी आलेले दोन गट पोलीस ठाण्यातच भिडले

फिर्याद देण्यासाठी आलेले दोन गट पोलीस ठाण्यातच भिडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाद झाल्याने फिर्याद देण्यासाठी आलेले दोन गट पोलीस ठाण्यातच भिडले. रविवारी (दि. 3) सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार निकीता सुद्रीक यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

शाहरूख अस्लम मनियार, शबाना अस्लम मनियार, परविन शाहरूख मनियार (सर्व रा. कपिलेश्वर मंदीराजवळ, माळीवाडा), नसीम रशीद शेख, अल्मास सैजल मनियार, मारूफअली रशीद शेख (सर्व रा. मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी पोलीस अंमलदार जी.एस.साठे हे ठाणे अंमलदार होते. त्यावेळी दोन गटांचे सहा जण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद देण्यासाठी आले होते.

ठाणेदार साठे यांनी त्यांच्याकडे काय झाले, अशी विचारणा करताच त्या दोन गटातील व्यक्तींनी आपसात एकमेकांशी शिवीगाळ करून आरडाओरडा केला. सार्वजनिक शांततेचा भंग करून आपसात एकमेकांशी झुंज देऊन मारामारी करताना मिळून आल्याने पोलिसांनी त्या दोन गटाच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार आर.के.दहिफळे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या