दिल्ली । Delhi
बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले भोजपुरी गायक आणि सुपरस्टार पवन सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. ते बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हे स्पष्ट करत, आपण केवळ पक्षाचे ‘खरे सैनिक’ म्हणून कार्यरत राहणार असल्याचे मत व्यक्त केले.
पवन सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, “निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी, पवन सिंह, माझ्या भोजपुरी समुदायाला सांगू इच्छितो की, मी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षात सामील झालो नाही आणि मला विधानसभा निवडणूक लढवायचीही इच्छा नाही.” पवन सिंह यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
अलीकडेच, पवन सिंह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते एनडीएतील कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण आता त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केल्याने, त्यांचे चाहते आनंदी झाले असून, ते आता भोजपुरी चित्रपट आणि संगीतावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. दुसरीकडे, राजकीय विश्लेषक या निर्णयाला भाजपची निवडणूक रणनीती म्हणून पाहत आहेत.
पवन सिंह यांचे वैयक्तिक आयुष्यही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिले आहे. त्यांची पत्नी ज्योती सिंग यांच्याशी सुरू असलेल्या वादामुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ज्योती सिंग यांनी पवन सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, ज्योती सिंग यांनी अलीकडेच जन सुरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या म्हणाल्या, “मी येथे निवडणूक लढवण्यासाठी किंवा तिकीट मागण्यासाठी आलेले नाही; पण माझ्यासारख्या अन्यायग्रस्त महिलांवर इतर महिलांनाही अशी परिस्थिती सहन करावी लागू नये, यासाठी मी आले आहे.”
या भेटीवर प्रशांत किशोर यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ज्योती जी मला बिहारी महिला म्हणून भेटायला आल्या होत्या. आम्ही त्यांच्या म्हणण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. त्यांनी कधीही निवडणूक लढवण्याचा किंवा तिकीट मागण्याचा संकेत दिला नाही. त्यांचा हेतू फक्त त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आहे.” एकंदरीत, भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांनी राजकीय मैदानातून स्वतःला दूर ठेवत, सध्या तरी कला क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.




