Monday, March 31, 2025
Homeनगरभोकरच्या रेणुकामाता मंदिरातील दानपेटी चोरीला

भोकरच्या रेणुकामाता मंदिरातील दानपेटी चोरीला

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आराध्य दैवत श्री रेणुकामाता मंदिराच्या मुख्यदरवाज्या बाहेरील शटरचे कुलूूप तोडून व कोयंडा उचकटून मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी हस्तरेषा ठसे तज्ज्ञ पथकाला ही पाचारण करण्यात आले होते. आत्तापर्यंत मंदिरातील हा तीसरा प्रकार असल्याने ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या असून या दान पेटीचा शोध घेवून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

भोकर गावचे पुरातन आराध्य दैवत असलेले श्री रेणुकामाता देवस्थान हे जागृत व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ख्याती असलेले देवस्थान आहे. बदलत्या काळानुसार येथे सुविधा उपलब्ध आहेत. येथे सुरक्षेसाठी मुख्य लाकडी दरवाजाचे बाहेर लोखंडी शटर व त्यास दोन कुलूप लावण्याची सुविधा या व्यतिरिक्त सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यात मुख्यसभा मंडपात चित्राबरोबरच आवाज खेचणारा अद्यावत कॅमेरा बसविलेला होता. ही सर्व यंत्रणा लोकसहभागातून उभारण्यात आलेली आहे. परंतू मंदिराच्या मुख्य सभामंडपातील कॅमेरा बंद असल्याचे लक्षात येवून ही येथील पुजार्‍याने याकडे दुर्लक्ष केल्याने या यंत्रणेचा तीतकासा उपयोग झाला नाही. त्याच बरोबर यापूर्वी तीन वेळा दानपेटी चोरीचा प्रकार घडलेला असतानाही येथील कारभारी ग्रामस्थांनी या पेटीला फौंडेशन न करता मोकळीच ठेवल्याने चोरट्यांना ही पेटी उचलून नेणे शक्य झाले. ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

येथील पुजारी योगेश दंडवते हे नेहमीप्रमाणे रविवार दि.30 मार्च रोजी संध्याकाळची आरती करून दोन्ही दरवाजांना तीन कुलूप लावून घरी गेले अन् काल पहाटे 5 वाजता प्रात: पुजेसाठी मंदिरात आले असता त्यांना लोखंडी शटर व लाकडी दरवाजा उघडा दिसला व आत दानपेटी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी गावातील काही प्रमुखांना संपर्क करून झालेला प्रकार सांगितला. यावेळी येथील प्रमुख नागरीकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. सीसीटीव्ही फुटेज नुसार मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबीन बन्सल, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, हवालदार संजय पवार व गृहरक्षक दलाचे कर्मचार्‍यांसह मंदिरात दाखल झाले. त्या पाठोपाठ आहिल्यानगर येथील हस्तरेषा ठसे तज्ज्ञ पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडनगेकर, हेड. काँ. रविंद्र गायकवाड, फोटोग्राफर प्रमोद खरपुडे व चालक संपत घोडके हे ही दाखल झाले, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबीन बन्सल, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पवार, पोलीसमित्र बाबा सय्यद व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी परीसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासणी सुरू आहे.

त्याच बरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही दानपेटीचा व चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. येथील मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात चोरट्यांनी आतल्या मुख्य दरवाजाचा कोयंडा उचकटल्याचे दिसले मात्र बाहेरील शटरला असलेल्या कुलुपापैकी एक कुलूप साधे होते तर एक कुलूप हे शटर लॉक होता ते दोन कुलूप येथे सापडले नाहीत, शिवाय शटर लॉक तोडताना शटरला इजा न करता तो तुटला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरात इतर कॅमेर्‍याच्या फुटेजनुसार दोन चोरटे तोंडाला बांधून आत प्रवेश करून ही दानपेटी उचलून मंदिराच्या बाहेर काढल्याचे दिसत आहेत. परंतु दानपेटी मोठी असल्याने या दोघा व्यतीरिक्त आणखीही आरोपी व चारचाकीचा वापर झाला असल्याची शक्यता नागरिकाकडून व्यक्त होत आहे. मंदिरातील व ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही व्यवस्थित असते तर या प्रकाराचा लवकर उलगडा झाला असता अशा प्रतिक्रीया उमटत आहेत. त्याचबरोबर हे चोरट्यांनी कॅमेर्‍यात येण्याचे टाळण्यासाठी भिंतीच्या कडेने पेटी उचलून नेली याचाच अर्थ चोरटे माहीतगार असावेत किंवा त्यांना स्थानिक हस्तक असावेत असाही तर्क लावला जात आहे.

याप्रकरणी येथील पुजारी योगेश दंडवते यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबीन बन्सल, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले करत आहेत.
दरम्यान यापूर्वी अशाच प्रकारे जुनी दानपेटी चोरट्यांनी चोरली होती ती गावतळ्याच्या कडेला नेवून तेथे फोडून आतील रक्कम घेवून पोबारा केला होता. त्यानंतर श्रीरामपूर येथील व्यावसायीक सूर्यकांत सगम यांनी सुमारे बारा वर्षापूर्वी अद्ययावत अशी दानपेटी येथे दान केलेली होती. ही दानपेटीही सुरूवातीला त्या अज्ञात चोरट्यांनी गावतळ्याच्या बाजूला नेवून फोडण्याचा प्रयत्न केला होता परंतू तो प्रयत्न असफल झाला. त्यानंतर गेल्या काही वर्षापूर्वी हिच दान पेटी अज्ञात चेारट्यांनी मंदिराच्या बाहेर ओढत आणून ती पेटी खालच्या बाजूने कटरने कट करून त्यातील चिल्लर सोडून केवळ नोटा घेवून पोबारा केला होता.

त्यावेळी ही सीसीटीव्ही फुटेजनुसार त्या चोरट्यापर्यंत पोलीस लवकरच पोहचतील अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतू तसे झाले नाही. आता तर त्या चोरट्यांनी दान पेटीच उचलून नेल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे. या दान पेटीत रोख रकमेसह भाविकांनी दान केलेले चांदी व सोन्याचे दागीने असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. चोरट्यांचा व दान पेटीचा शोध लावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंचपती प्रताप पटारे, उपसरपंच संदिप गांधले, सदस्य गीरीष मते, काळू गायकवाड, भाजपाचे भाऊराव सुडके, जगदंबा प्रतिष्ठानचे गणेश छल्लारे, गोरख डूकरे, दिपक शेळके, माजी पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, किशोर मते यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिक्षणाच्या बदलत्या वाटा : राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षक केंद्रस्थानी

0
संगमनेर |संदीप वाकचौरे|Sangamner शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षकाला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत...