अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील भुसार मार्केटयार्डमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री आठ दुकाने फोडली. मात्र चोरट्यांच्या हाती एकाच दुकानातील 6 हजार 500 रूपयांची रोकड लागली. या प्रकरणी नवकार पशुखाद्य दुकानाचे मालक संजय चुनिलाल लुनिया (वय 61 रा. आनंदधाम, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय लुनिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 जुलै रोजी रात्री 8 वाजता त्यांनी आपले नवकार पशुखाद्य दुकान बंद केले. दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता कामगार विकास आमले दुकान उघडण्यासाठी गेला असता, दुकानाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्याने तात्काळ लुनिया यांना माहिती दिली. दुकानात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले असता शटरचे लॉक तोडलेले होते व सामानाची उचकापाचक झालेली होती. दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 6 हजार 500 रूपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे लुनिया यांनी निदर्शनास आणले. विशेष म्हणजे, लुनिया यांच्या दुकानाशेजारील आणखी सात दुकाने देखील फोडल्याचे समोर आले असून, यामध्ये मानकचंद उत्तमचंद भंडारी, विजय भागवत कोंथिबीर, प्रितेश जयकुमार पुंगलिया, नितीन शांतीलाल कटारिया, विजय शांतीलाल कटारिया, प्रशांत अर्जुन सोलाट, सुमित प्रकाश कटारिया यांच्या दुकानांचा समावेश आहे.
भुसार मार्केटमध्ये एकावेळी आठ दुकान फोडल्याने व्यापार्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. रात्रीच्या वेळी मार्केटयार्ड परिसरात सुरक्षेचा अभाव असल्याचा आरोप व्यापार्यांनी केला असून, पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात एका दुकानातून 6 हजार 500 रूपयांची रोकड चोरीला गेली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दुकानातून काही रोकड किंवा इतर साहित्य चोरीला गेली का? याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे चोरीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके काम करत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.




