Tuesday, March 25, 2025
HomeनगरBalasaheb Thorat : काँग्रेसला मोठा धक्का! संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत

Balasaheb Thorat : काँग्रेसला मोठा धक्का! संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत

संगमनेर । प्रतिनिधी| Sangamner

सलग आठवेळा संगमनेर मतदारसंघावर वरचष्मा असणारे काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीचे सर्वसामान्य उमेदवार अमोल खताळ यांनी 10 हजार 560 मतांनी त्यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत थोरातांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही नाव चर्चेत होते. अखेर या चर्चांनाही धक्कादायक निकालातून पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर मतदारसंघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुती कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष लागून होते. सुरुवातीला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत होते. मात्र, धांदरफळ येथील सभेनंतर हे चित्र पालटले. अखेर नवखे आणि सर्वसामान्य कार्यकर्ते असलेले अमोल खताळ यांना महायुतीने (शिवसेना शिंदे गट) उमेदवारी जाहीर केली. त्यांना विखे परिवाराने संपूर्ण ताकद दिली. गावोगावी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा जोरदार प्रचार केला. तर थोरातांनी विखेंना शह देण्यासाठी शिर्डी मतदारसंघात आपली ताकद लावली होती. त्यामुळे आपल्या मतदारसंघाऐवजी त्यांनी तिकडेच जास्त लक्ष केंद्रीत केले होते.

मात्र, डॉ.सुजय विखेंनी जोरदार सभा घेऊन थोरातांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. याचा झालेला परिणाम शनिवारी झालेल्या मतमोजणीतून समोर आला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या सुरुवातीला अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थोरात यांनी राज्यभर महाविकास आघाडीसाठी प्रचार दौरा केला. याचवेळी खताळ यांनी गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. परिणामी एकतर्फी वाटणारी निवडणूक हळूहळू चुरशीची झाली. विखे पिता-पुत्रांनी वेढलेल्या चक्रव्यूहात थोरात हळूहळू अडकत गेले. अखेर याचा संपूर्ण परिपाक शनिवारी झालेल्या निकालातून स्पष्टपणे दिसून आला. पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकून राहिली.

शेवटी 10 हजार 560 मतांनी थोरातांचा दारुण पराभव झाला. तत्पूर्वी राज्यात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात थोरातांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या निवडणुकीत भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले. परंतु, मतदारांनी त्यांना कौल न दिल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. या निकालाने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहरासह ग्रामीण भागातही गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. ठिकठिकाणी विजयी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नेहमीच मतदारसंघावर एकहाती वर्चस्व ठेवणार्‍या बाळासाहेब थोरातांना ही निवडणूक या निकालाने आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...