मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे चार दिवस राहिलेले असताना ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीशी प्रामाणिक असलेले आणि सच्चे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवडीचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात असून ठाकरे गटासाठी चिंतेची बाब समजली जात आहे.
दगडू सकपाळ हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. लालबाग-परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांची मोठी पकड आहे. मात्र, आगामी निवडणुकीत आपल्या मुलीला पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आणि तिकीट नाकारल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यांच्या या नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती, ज्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश झाला.
आपल्या हयातीत मुलगी नगरसेवक व्हावी अशी इच्छा होती पण…
आपले संपूर्ण कुटुंब शिवसेनेत (ठाकरे) कार्यरत आहे. अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी झाल्यानंतर आपल्यावर गुन्हे दाखल झाले. पक्षासाठी झोकून काम केले. गेल्या १५ वर्षांमध्ये पक्षाकडे आपण काहीच मागितले नाही. आपल्या हयातीत मुलगी नगरसेविका व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे मुलीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु पदरी निराशा आली. शिवसेनेनेच मला मोठे केले. “ज्या पक्षासाठी आयुष्य वेचले, तो पक्ष सोडताना नक्कीच वेदना होत आहेत. मी हा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला आहे,” पण इतकी वर्षे सक्रिय सहभागानंतर पक्षाने आपल्याला दणका दिला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
याबद्दल दगडू सपकाळ म्हणाले की, काही अडचणी होत्या तर त्या मला सांगायला पाहिजे होत्या. मला एक फोन करुन सांगितले असते, दगडू हे लोक म्हणतात की रश्मी निवडून येणार नाही. तर ते लोक कोण आहेत त्यांना माझ्या समोर आणायचे असते. मात्र आम्हाला साधं विचारले देखील नाही. एक फोन करुन तरी सांगायचे होते, अशी खंत माजी आमदार सकपाळ यांनी व्यक्त केली.
मी म्हातारा झालो म्हणून का?
मला मातोश्रीनेच मोठं केलं, मी मोठा झालो तो मातोश्रीमुळेच, हे मी कधीही नाकारत नाही, असेही सकपाळ म्हणाले. ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही, भाजपमध्ये जाऊ शकत नाही. मग कोणता पक्ष शिल्लक राहिला. तर हाच राहिला. आता पक्षप्रवेश केला. आता काम करणार. मला काहीही दिलेलं नाही. मुलीला काहीही दिलं नाही, मुंबई महापालिका निवडणुकीत मातोश्रीकडून संपर्क झाला नाही, मी म्हातारो झालो म्हणून का, अशी खंत व्यक्त करत त्यांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
आम्हाला खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचा आर्शिवाद मिळाला
सकपाळ यांच्या प्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मुंबईत, विशेषतः दक्षिण मुंबईत शिवसेना वाढवण्यात आणि रुजवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या येण्याने शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. आज आम्हाला लालबागच्या राजाचा आणि मुंबईच्या राजाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळाला आहे.”




