पाटणा | Patna
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) वरचष्मा दिसत आहे. अनेक संस्था व माध्यमांनी दिलेले ओपिनियन व एक्झिट पोल खरे ठरताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुकीचे कौल पाहता महागठबंधनचा दारूण पराभव होत असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे आणि एनडीएने बहुमताचा आकडा सहज ओलांडला आहे.
मतदारांचे विरोधकांबाबतचे बदलेले मत, भाजपा-जेडीयूचा आक्रमक प्रचार, महिला व युवकांची निवडणुकीतील भूमिका या निकालांमध्ये निर्णायक ठरल्याचे चित्र दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे, विकास, बेरोजगारी, जातीय समीकरणे, आक्रमक प्रचार आता निर्णायक ठरत आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी २ वाजेपर्यंत, भाजप ९३ , जेडीयू ८३ , आरजेडी २६ , एलजेपी रामविलास १९ , सीपीआयएमएल ४ आणि काँग्रेस ४ जागांसह आघाडीवर आहेत. एकूण २३८ जागांसाठी कल समोर आले आहेत, तर अधिकृत विजय अद्याप जाहीर झालेला नाही. तथापि, सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. अंतिम निकाल जसजसे येतील तसतसे बिहारचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.
बिहारच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून ‘सुशासन बाबू’ अशी ओळख असलेले नितीश कुमार हे कोणत्याही आघाडीचे अविभाज्य घटक राहिले नाहीत. त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि वाढत्या वयामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने या कमकुवतपणाचा फायदा घेऊन बिहारमध्ये आपले स्वतंत्र वर्चस्व स्थापित करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीआधी २०२४ साली ‘जनुसराज पक्षाची’ स्थापना केली. त्यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढली होती. संपूर्ण राज्यात त्यांनी प्रचार केला. मात्र, त्यांच्या पक्षाच्या एकाही उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही. पहिल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना मोठे अपयश आले असून त्यांचा एकही उमेदवार निवडणून आला नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, प्रशांत किशोर यांनी अनेक मुलाखतींमध्ये दावा केला होता की जदयू २५ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. जदयूने २५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, असे ते म्हणाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




