Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBihar Election 2025 : NDA च्या महाविजयानंतरही बिहारमध्ये नितीशबाबू करू शकता 'खेला';...

Bihar Election 2025 : NDA च्या महाविजयानंतरही बिहारमध्ये नितीशबाबू करू शकता ‘खेला’; भाजप सत्तेपासून राहू शकते दूर, कसं आहे गणित?

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे (Bihar Election Result) निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी व नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या महायुतीने (Mahayuti) २०२ जागा जिंकत प्रचंड विजय मिळवला. तर सत्तेची स्वप्ने पाहत असलेल्या राहुल गांधी व तेजस्वी यादव यांच्या महाविकास आघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांचे सत्तेचे स्वप्न भंगले. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील २४३ जागांपैकी २०२ जागांवर एनडीएने विजय मिळवला आहे, तर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही.

- Advertisement -

यंदाच्या बिहार निवडणुकीत भाजपला (BJP) ८९ जागा मिळाल्या आहेत. तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयूला ८५ आणि चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला १९ जागांवर विजय मिळाला आहे. तसेच सीताराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी महाआघाडीतील (Maha Aaghadi) आरजेडीला २५ जागा तर मित्रपक्ष काँग्रेसला ६ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय ओवेसी यांच्या एआयएमआयएमला पाच आणि इतरांना ९ जागांवर विजय मिळाला आहे.

YouTube video player

कसं आहे बिहारच्या सत्तेचे गणित?

बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा असून, बहुमतासाठी १२२ जागांची गरज आहे. नितीश कुमार यांना बिहारमध्ये ‘पलटू’राम म्हणून ओळखले जाते. यापूर्वी त्यांनी भाजपची साथ सोडून बिहारमध्ये सत्तेचा प्रयोग केला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासोबत जाणे ही भाजपची सध्याची गरज असली तरी नितीश कुमार यांना भाजपची गरज आहेच, असे नाही.मात्र १२२ जागांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी नितीश कुमार यांना काही तडजोडी कराव्या लागतील. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला ८५ जागा मिळाल्या असून, त्यांना बिहारमध्ये सरकार बनविण्यासाठी ३७ जागांची आवश्यकता आहे. आरजेडी, काँग्रेस आणि एमआयएमसह इतर एक आकडी आमदारांना स्वतःकडे वळविण्यात जर नितीश यशस्वी झाले तर बिहारमध्ये बिगर भाजपचे सरकार अस्तित्वात येऊन ‘खेला’ होऊ शकतो. हे विरोधक एकत्र आल्यास हा आकडा १४५ इतका होऊ शकतो.

जेडीयूत पडू शकते फुट

नितीश कुमारांनी जर भाजप सोडून विरोधकांसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तर जेडीयूमध्ये मोठी फुट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण भाजपने अनेकदा जेडीयूला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये आणि त्याआधी देखील जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर होती. त्यावेळी ११ आमदारांची एक गुप्त बैठक झाली होती. त्यावेळी जेडीयू फुटण्याची भीती व्यक्त झाली होती. याशिवाय गेल्या वर्षी देखील असाच प्रयोग झाला होता.तर यंदा एप्रिलपासूनच जेडीयूत मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीला असाच सुरूंग लावण्यात आला होता.

२०१० ची पुनरावृत्ती

२०२५ च्या एनडीएच्या विजयानंतर २०१० च्या निवडणूक निकालाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. ही तीच निवडणूक होती ज्यात भाजप आणि नितीशकुमार यांच्या जेडीयूने फक्त कमालच केली नाही तर विरोधकांना जबरदस्त झटका दिला होता. २०१० साली नितीशकुमारांची जेडीयू एनडीएचा भाग होती. तेव्हा जागावाटपात जेडीयू १४१ तर भाजपने १०२ जागांवर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत बिहार भाजपचा चेहरा सुशीलकुमार मोदी होते, ज्यांचे निधन झाले आहे. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीने १६८ तर रामविलास पासवान यांच्या एलजेपीने ७५ जागांवर निवडणूक लढली होती. काँग्रेसने स्वबळावर २४३ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत महाआघाडी नव्हती परंतु आरजेडी आणि एलजेपी यांची आघाडी होती. जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा एनडीएने रेकॉर्डब्रेक २०६ जागांवर विजय मिळवला. या निकालात विरोधी आरजेडी, एलजेपी आणि काँग्रेसला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत जेडीयू ११५, भाजप ९१ जागांवर विजयी झाली होती. दुसरीकडे आरजेडी २२ आणि एलजेपी ३ आणि काँग्रेसने ४ जागा जिंकल्या होत्या. इतरांना या निकालात ८ जागा मिळाल्या होत्या.

ताज्या बातम्या