नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच, बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ ला संपत असल्याने, त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे. एसआयआर प्रक्रिया देखील यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी आयागोने बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे आभार मानले. या अधिकाऱ्यांनी एसआयआरद्वारे मतदार याद्या दुरुस्त केल्या आहेत.
निवडणुक आयोगाच्या पथकाने पाटणा येथे राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, विशेष पोलिस नोडल अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला. तसेच, बिहारच्या या निवडणुकीत लागू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना भविष्यात देशभरात राबवल्या जातील,असेही यावेळी मुख्य निवडणूक अयुक्तांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार म्हणाले, “बूथ लेव्हल अधिकारी मतदारांकडे जातील तेव्हा मतदार त्यांना नीट ओळखू शकतील यासाठी या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना रंगीत ओळखपत्र दिले जाईल. तसेच आता मतदान केंद्रांबाहेर मोबाइल जमा करून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याआधी मोबाईल घरी व इतरत्र कुठल्याही ठिकाणी ठेवून मतदान केंद्रावर जावे लागत होते. तसेच सुलभतेसाठी, कुठल्याही अडथळ्याशिवाय व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पाडता यावी यासाठी कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार नसतील.
बिहारमध्ये वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाईल. आता प्रत्येक उमेदवार आपल्या एजंटला बूथपासून १०० मीटर अंतरावर तैनात करू शकेल. सर्व मतदानकेंद्रांवर १००% वेबकास्टिंग होईल. EVM वर आता काळ्या-पांढऱ्या मतपत्रिकांऐवजी रंगीत छायाचित्र आणि क्रमांक असलेल्या मतपत्रिका असतील, ज्यामुळे उमेदवारांची ओळख सोपी होईल. परिणामी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहील.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




