पाटणा | Patna
बिहारच्या राजकारणात नव्या नांदीला सुरवात होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय चौधरी होते. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जवळपास पाच ते सहा मिनिटांच्या चर्चेनंतर नितिश कुमार लोकभवनातून बाहेर पडले.
भाजप आमदारांची बैठक
एकीकडे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरीकडे भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि विजय सिंह यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली ज्यात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार
सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदी निश्चित झाल्यानंतर नितीश कुमार यांचे पुत्र, निशांत कुमार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. उद्या, १५ एप्रिल रोजी, सकाळी ११ वाजता लोक भवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल. निशांत कुमार आणि विजय चौधरी यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित आहे.
अमरावती जिल्हा हादरला! दोन तरुण, १८० तरुणींवर लैंगिक शोषण, ३५० व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग
आरजेडीतून जेडीयूमार्गे भाजपमध्ये आलेले सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील. बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच आपला मुख्यमंत्रीपदी देणार आहे. वीरचंद्र पटेल मार्गावरील भाजप कार्यालयात पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. नवीन सरकार स्थापन करण्याचा आपला दावा दाखल करण्यासाठी ते लवकरच लोकभवनात जातील.
कोण आहे सम्राट चौधरी?
सम्राट चौधरी यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६८ रोजी झाला. त्यांचा विवाह ममता कुमारी यांच्याशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शकुनी चौधरी आणि आईचे नाव पार्वती देवी आहे. सम्राट चौधरी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे वडील, शकुनी चौधरी, एक समाजवादी नेते मानले जातात. शकुनी चौधरी एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे जवळचे सहकारी होते. नंतर, शकुनी चौधरी यांनी आपली राजकीय दिशा बदलली आणि नितीश कुमार यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली.
सम्राट चौधरी यांना राजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील, शकुनी चौधरी, हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. सम्राट चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी राजकारणाची मूलतत्त्वे लालू प्रसाद यादव यांच्याच शाळेत, म्हणजेच आरजेडीमध्ये शिकली, सध्या ते त्यांचे विरोधक आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आरजेडीमधून केली. सम्राट चौधरी हे बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. उपमुख्यमंत्री म्हणून काम करून नंतर मुख्यमंत्री बनलेले ते बिहारमधील दुसरे नेते आहेत.




