अमरावती | Amaravati
राज्यात भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असून या प्रकरणात रोज नवनविन खुलासे समोर येत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणापासून ते संपत्ती पर्यंत या प्रकरणाची व्याप्ती असून या प्रकरणाचा SIT कडून सखोल तपास केला जात आहे. हे प्रकरण कमी होते तोच अमरावतीमधून एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा राज्यात खळबळ माजवली आहे. जिल्ह्यातील परतवाडा येथे सोमवारी ( १३ एप्रिल ) उघडकीस आलेल्या व्हिडिओ कांडामुळे अमरावती शहरासह जिल्हा हादरून गेला आहे.
सोशल मीडियावर सुमारे ३५० अश्लिल व्हिडिओ आणि अनेक आपत्तीजनक फोटो व्हायरल झाले आहेत. यात तब्बल १८० मुलींवर अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण परसले आहे. संबंधित मुलींना फसवून, त्यांचे गुप्तपणे चित्रीकरण करून हे व्हिडिओ तयार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे. तन्वीरने इच्छा नसतानाही अनेकांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या तरुणाने १८० तरुणींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
इराणला अमेरिकेची सर्वात मोठी अट मान्य? अमेरिकेकडून वाटाघाटीसाठी दुसऱ्या फेरीची घोषणा, युद्ध टळणार?
अमरावतीच्या परतवाडा शहरातील रहिवासी असणाऱ्या तन्वीरने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केल्यानंतर या मोबाईल फोनमध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ असण्याची शक्यता आहे.
३५० अश्लिल व्हिडिओ आणि फोटो व्हायरल
यासंदर्भात बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, “मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन मुलांनी साधारपणे ३५० अश्लिल व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले. यात हिंदू आणि अल्पवयीन मुलींचा समावेश. यामाध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, पैसे उकळणे आणि वेश्यावृत्तीकडे ढकलणे, असे प्रकार केले जात असे. हे प्रकरण केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून एक मोठे षडयंत्र असल्याचे खासदार अनिल बोंडे म्हणाले.”
१८० मुलींवर अत्याचार झाल्याचा अंदाज
“अतिशय गंभीर प्रकरण परतवाड्यात सुरू आहे. लव्ह जिहाद हे होतेच, पण पोरांची टोळी अशी कृत्ये करत आहे. यात मुस्लीम आणि हिंदूही मुली पीडित आहेत. यात १८० मुलींवर अत्याचार झाल्याचा अंदाज आहे. ३५० व्हिडिओ स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाले आहेत,” असा दावाही खासदार बोंडेंनी केला आहे.
अत्याचार झालेल्या महिला-मुलींपर्यंत महिला पोलीस पोहोचू शकतात. त्यांच्याकडून मोठी माहिती मिळू शकते. परतवाडा चिखलदरा शहरातील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळू शकतात. गेल्या सहा महिन्यातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले तर त्यामधून एक मोठा रॅकेट पुढे येईल, असेही अनिल बोंडे म्हणालेत.
सायबर सेलच्या माध्यमातून पुरावे गोळा केले जात आहे
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस अधिकारी विशाल आनंद सिंगुरी यांनी सांगितले की, जर अद्याप कोणीही पीडित पुढे येऊन तक्रार नोंदवत नसेल तरी सायबर सेलच्या माध्यमातून पुरावे गोळा केले जात आहेत. व्हायरल झालेले व्हिडिओ सायबर पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.




