Sunday, October 6, 2024
Homeनगरदुचाकीच्या धडकेत इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे रात्री जेवणानंतर शतपावली करणारा तरुण मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत ठार झाला. धडक देणारा दुचाकीस्वार हा वाळूतस्करीशी निगडित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी जमलेल्या स्थानिक रहिवाशांनी दुचाकीस्वाराच्यामागून येणार्‍या वाळूच्या डंपरच्या टायरची हवा सोडून देत पोलिसांच्या ताब्यात दिला. सकाळी तरुणाचा अंत्यविधी झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीविरोधात तब्बल 2 तास रास्तारोको केला. तहसीलदार व पोलीस अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. अनधिकृत वाळूच्या गाड्या दिसतील तिथे त्या पेटवून दिल्या जातील असा खणखणीत इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी वाळूतस्करी विरोधात ग्रामस्थांचा प्रक्षोभ दिसून आला. संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार अमोल मोरे यांनी दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सिव्हिल इंजिनियर प्रशांत सुनील कडू (वय 27) यांचा यांचा शुक्रवारी रात्री दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. रात्री नऊ वाजता जेवणानंतर ते पत्नीसमवेत पाथरे बुद्रुक कोल्हार रोडलगत असलेल्या त्यांच्या घराजवळ रस्त्याने शतपावली करत होते. अचानक त्यांना पाठीमागून दुचाकीची जबर धडक बसली. दुचाकीवर दोघेजण स्वार होते. धडक इतकी जोराची होती की, यामध्ये प्रशांत कडू जबर जखमी झाले व प्रचंड रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यानच्या काळात घटना घडल्यानंतर दोघांपैकी एक दुचाकीस्वार पळून गेला. दुसर्‍याला स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. ते अवैध वाळू तस्करीशी निगडित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुचाकीमागून वाळूचा डंपर येत होता. स्थानिकांनी डंपर थांबवून त्याची हवा सोडून दिली. याबाबत महसूल अधिकारी व पोलिसांना कळविण्यात आले.

रात्रीच्यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, तलाठी सलीम इनामदार घटनास्थळी हजर झाले. यावेळी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाळूचा डंपर लोणी पोलिस ठाण्यात नेण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान मयत प्रशांत कडू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी पाथरे बुद्रुक येथील चौकामध्ये अवैध वाळूतस्करी विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. रात्रंदिवस पाथरे बुद्रुक येथून वाळू उपसा सुरू असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र शब्दात चीड व्यक्त केली. वाळू तस्करांवर व अपघातातील संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास पाथरे बुद्रुकमध्ये जिथे वाळूचे डंपर किंबहुना वाळूच्या गाड्या दिसतील तिथे त्या पेटवून दिल्या जातील असा सज्जड दम ग्रामस्थांनी दिला. शासन जर बेकायदेशीर वाळू उपसा बंद करत नसेल तर ग्रामस्थ कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांच्या आशिर्वादाने वाळूतस्करी सुरू असल्याचे ताशेरे नागरिकांनी ओढले.

गेल्या कित्येक दिवसापासून पाथरे बुद्रुक येथून अवैध वाळूतस्करी सुरू आहे, असे असतानादेखील महसूल अधिकार्‍यांना याबाबत काहीच माहिती नाही का? असा उपरोधिक सवाल करत वाळू तस्करांकडून महसूल अधिकारी व पोलिसांना हप्ते चालू असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले. वाळूतस्करीत कोणकोणाचे हात बरबटले आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे. अवैध वाळू तस्करीबाबत ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतने अनेकदा अर्ज केले. तरीदेखील तहसीलदारांनी कारवाई का केली नाही? वाळू तस्करांची मुजोरी वाढत चालली असल्याचे ग्रामस्थांनी सुनावले. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, तलाठी सलीम इनामदार, सरपंच उमेश घोलप, सोसायटीचे चेअरमन अशोकराव कडू तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

तहसीलदार अमोल मोरे ग्रामस्थांना आश्वासन देताना म्हणाले, पाथरे बुद्रुक येथे ज्याठिकाणी अवैध वाळूसाठे आढळून आले आहेत, त्यांचे पंचनामे करून त्यावर बोजे चढविले जातील. अवैध वाळू वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देणार्‍यांवर कारवाई करू. नदीपासून वाळू वाहतुकीच्या रस्त्यांवर जेसीबीच्या साह्याने चर खोदले जातील. काल झालेल्या अपघाताच्या घटनेबाबत संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

कडू परिवाराचा आधार गेला
अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रशांत कडू हे 27 वर्षीय विवाहित तरुण सिव्हिल इंजिनियर होते. त्यांच्या पश्चात आई, आजी, पत्नी, एक अविवाहित बहीण, चुलते असा परिवार आहे. एक वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर प्रशांत कडू यांनी घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवली होती. आता त्यांच्या या अपघाती निधनानंतर परिवाराचा मुख्य आधार गमावला गेला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या