Monday, June 17, 2024
Homeनगरदुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद; 10 दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद; 10 दुचाकी हस्तगत

एलसीबीची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दुचाकी चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच बुलेटसह एकूण 13 लाख 70 हजारांच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अनिल मोतीराम आल्हाट (वय 23), हर्षद किरण ताम्हाणे (वय 18), निखील उध्दव घोडके (वय 18 सर्व रा. श्रीगोंदा) अशी त्यांची नावे आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते.

त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, विशाल तनपुरे, अमोल कोतकर, संतोष खैरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांचे पथक काम करत होते. पथक जिल्ह्यामधील दुचाकी चोरी करणार्‍या संशयित आरोपींची माहिती काढत असताना गुरूवारी (दि 30) निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की, तीन इसम चोरीच्या विनानंबरच्या दुचाकीवरून श्रीगोंदा बायपास येथे येणार आहे. निरीक्षक आहेर यांनी सदरची माहिती पथकास कळवून कारवाई करण्याबात सूचना दिल्या.

पथकाने तात्काळ श्रीगोंदा बायपास परिसरात सापळा लावून तिघा संंशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची त्यांनी कबुली दिली व नगर व पुणे जिल्ह्यातून 10 दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. नगर व पुणे जिल्ह्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील तिघांना पुढील तपासकामी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या