अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी दुचाकी चोरी करणार्या एका युवकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1 लाख 55 हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शिवम सुधीर कांबळे (वय 24 रा. लोणी बुद्रुक, आहेर चाळ, ता. राहाता) असे त्याचे नाव आहे.
दिनकर भास्कर जोरी (वय 40, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) हे त्यांच्या घराशेजारी असलेल्या नवनाथ मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात सेवेकरी म्हणून मदत करत होते. सप्ताहाच्या दरम्यान त्यांची ओळख शिवम नावाच्या इसमाशी झाली. शिवम हा देखील सप्ताहात मदत करत असल्याने दोघांत स्नेह निर्माण झाला. 17 एप्रिल रोजी सकाळी 7.15 वाजता शिवमने दिनकर जोरी यांच्याकडे बोल्हेगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी दुचाकी मागितली. त्यांनी विश्वासाने त्यांची दुचाकी दिली. मात्र बराच वेळ उलटूनही शिवम परत आला नाही. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर देखील तो मिळून न आल्याने, दिनकर जोरी यांनी 23 एप्रिल रोजी तोफखाना पोलीस फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान शिवम सुधीर कांबळे याला एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.