अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातून दुचाकी चोरी करणार्या चोरट्याला पोलिसांनी शनिवारी (ता.4) जेरबंद केले आहे. महेंद्र बाळू सुपेकर (रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. काष्टी परिसरात एक व्यक्ती विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पाठविलेल्या पोलीस पथकाने महेंद्र बाळु सुपेकरला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोर्टाचे पार्किंग, श्रीगोंदा शहर, काष्टी व इतर ठिकाणाहून दहा दुचाकींची चोरी केल्याचे सांगितले.
‘मित्राला पैशांची गरज असून त्याच्या मोटार सायकलची कागदपत्रे नंतर देतो’ असे सांगून महेंद्र सुपेकर हा चोरीच्या दुचाकी विकायचा. तर काही दुचाकी त्याने घराजवळील शेतात लपवून ठेवल्या होत्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत त्यांनी श्रीगोंदा पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोलीस नाईक गोकुळ इंगावले, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, संदीप शिरसाठ, सचिन गोरे, अरुण पवार यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब तरटे व प्रविण गारुडकर करत आहेत.