शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon
खून, दरोडा व मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते (रा. सामनगाव, ता. शेवगाव, ह.रा. इंदिरानगर, शेवगाव) यास शेवगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सदर कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास शेवगाव येथील ग्राफिक्स दुकानावर फिर्यादी राहुल किसन वाघमोडे (वय 26, रा. रेणुकानगर, शेवगाव) हे असताना आरोपी सचिन काते व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर झालेल्या वादातून फिर्यादीचे वडील किसन वाघमोडे यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपी सचिन काते हा फरार झाला होता. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आरोपीच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला होता. दरम्यान दि. 18 जून 2026 रोजी आरोपी आखेगाव रोड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी सचिन काते याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सांगवी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड) येथे मकोका अंतर्गत गुन्हा, तसेच शेवगाव पोलीस ठाण्यात पोस्को व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणार्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक रामहारी खेडकर, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, पोलीस हवालदार परशुराम नाकाडे, राजेंद्र केदार, पोलीस हवालदार सचिन काळे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित पालवे, धनेश्वर पालवे, ईश्वर बेरड, शाम गुंजाळ, एकनाथ गर्कळ, वसंत वैद्य, राजू बडे, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, राहुल खेडकर, तान्हाजी सानप, सचिन पिरगळ यांचा समावेश होता.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत.




