Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्या“माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव, सोनिया गांधी, राहुल गांधींना...”; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर...

“माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव, सोनिया गांधी, राहुल गांधींना…”; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मांडली भूमिका

मुंबई | Mumbai

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असून त्या लवकरच पक्षांतर करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. या संदर्भात राज्यात नव्याने दाखल झालेल्या बीआरएस पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तर पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले होते. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील काँग्रेस पक्ष पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली. आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, अशा बातम्या चालवण्यात आल्या. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. माध्यमांना कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनेल्सवर मानहानीचा दावा ठोकणार आहे, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. तसेच २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या नंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या, त्याकडेही मी गांभीर्याने पाहिले नाही. असे म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. पाठित खंजीर खुपसण्याचे माझ्या रक्तात नसल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी आपल्या पहिल्या मुलाखतीचा संदर्भही दिला. माझी पहिली मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतली होती. तेव्हा मी म्हणाले होते की राजकारणात ज्या विचारसरणीला समोर ठेवून मी राजकारणात आले, त्या विचारसरणीशी मला जेव्हा प्रतारणा करावी लागेल, मला चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा मी राजकारणातून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. मी तो ब्रेक घेणार आहे. एक-दोन महिने मी सुट्टी घेणार आहे. जनतेच्या बाबतीत काय घडतंय, यावर विचार करण्याचीही गरज आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे. त्याच वाटेवर मी आहे का, हे तपासून बघण्याची मला गरज आहे. मी ब्रेक घेण्याचं यासाठी सांगतेय की कृपा करून कुणी माझ्यासमोर माईक घेऊन प्रतिक्रिया विचारायला येऊ नका. कुणी माझ्याबाबतीत काय म्हणतंय त्यावर बोलणं माझं काम नाहीये. मला जे करायचंय, ते मी करेन. ते फक्त विचारसरणीवर आधारित असेल. या ब्रेकमध्ये मला आजच्या राजकारणावर विचारमंथन करायचं आहे, असं पंकजा मुंडेंनी यावेळी नमूद केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या