तिरुवनंतपुरम । Thiruvananthapuram
दक्षिणेकडील केरळ राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नवा इतिहास रचला आहे. राज्याची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर भाजपाने पहिल्यांदाच आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते वी.वी. राजेश यांची महापौरपदी निवड झाली आहे. केरळच्या राजकीय इतिहासात भाजपाने मिळवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.
शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या निवडणुकीत वी.वी. राजेश यांना १०० सदस्यांच्या सभागृहात ५१ मते मिळाली. भाजपाच्या ५० नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकाने राजेश यांच्या बाजूने मतदान केले. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले सीपीआयएमचे आर.पी. शिवाजी यांना २९ मते मिळाली, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF) चे उमेदवार के.एस. सबरिनाथन यांना १९ मतांवर समाधान मानावे लागले.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने ५० जागा जिंकून सत्तापालटाचे संकेत दिले होते. आज प्रत्यक्षात महापौर निवडीनंतर भाजपाने आपला भगवा फडकवला आहे. हा विजय भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, कारण गेल्या ४५ वर्षांपासून तिरुवनंतपुरम महापालिकेवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीएम) ची एकहाती सत्ता होती. भाजपाने सीपीएमच्या या अभेद्य गडाला खिंडार पाडत दक्षिणेत आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सीपीएम आणि काँग्रेसने मिळून गेल्या अनेक दशकांपासून शहराचा विकास रोखला होता. महापालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले होते. ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांपासूनही जनतेला वंचित ठेवण्यात आले होते.”
पुढील सहा महिन्यांत केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा महत्त्वाच्या वळणावर राजधानीच्या शहरात मिळालेला हा विजय भाजपासाठी मोठे टॉनिक ठरणार आहे. केरळमध्ये २०१६ मध्ये भाजपाने पहिली विधानसभेची जागा जिंकली होती, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांच्या रूपाने पहिला खासदार मिळवला होता. आता तिरुवनंतपुरममध्ये मिळालेल्या या यशामुळे केरळच्या शहरी राजकारणात भाजपाची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौरपद स्वीकारल्यानंतर वी.वी. राजेश यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. “आम्ही सर्वांना सोबत घेऊन सर्व वार्डांचा विकास करू. तिरुवनंतपुरमला देशातील पहिल्या तीन प्रमुख शहरांमध्ये समाविष्ट करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. आजपासून आमच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




