श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या माध्यमातून पक्षात विविध पदांच्या आमिषाने दाखवून महिलांसोबत ढाब्यावर पार्ट्या करणे, नाचगाणे करणे तसेच उशिरा रात्रीपर्यंत महिलांना थांबवणे, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत भू-माता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
भू-माता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या काही महिला पदाधिकार्यांनी भाजपचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या विरोधात आमच्या पुणे येथील कार्यालयात येऊन तक्रार केली आहे.
जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे पदाचे आमिष दाखवून महिलांना रात्रीपर्यंत थांबवणे, ढाब्यावर बोलावणे, डान्स करायला लावणे, पार्ट्या करणे असे प्रकार त्यांच्या माध्यमातून चालत असल्याचे महिला पदाधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
नितीन दिनकर यांना पोलीस संरक्षण असल्याने त्याचा वापर दहशतीसाठी केला जातो, तसेच ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात कोणीही बोलण्याची हिंमत करत नाही, आणि एखादा जर बोलला तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी दिनकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्याकडेही याबाबत आपण तक्रार केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तृप्ती देसाई यांनी एक व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना मेल केला आहे. त्यात काही कार्यकर्ते ‘तेरे जैसा यार कहाँ’ या गाण्यावर नृत्य करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपाच्या अंतर्गत वादाने आता वेगळे रूप घेतले की काय? अशी शंका यातून निर्माण होत आहे. याबाबत भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
अब्रू नुकसानीचा दावा करणार
आपल्याविरोधात रचलेले हे एक षडयंत्र आहे. मुळात तृप्ती देसाई या खोटी व चुकीची माहीती देत आहेत. जो वाढदिवसाचा व्हिडीओ त्यांनी व्हायरल केला, तो माझ्या भाचीच्या वाढदिवसाचा व्हिडीओ आहे. सदर कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठीत उपस्थित होते. महिलांशी गैरवर्तन केल्याचा भू-माता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा आरोप धांदात खोटा आहे. आपला आणि नशेचा लांबवर संबंध नाही. त्यामुळे ज्यांनी कुणी आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे, त्यांच्याविरुध्द आपण गुन्हा दाखल करणार आहोत. त्याबरोबरच आपली बदनामी करणार्यांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी सांगितले.
देसाई यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या तक्रारीवरुन तृप्ती देसाई यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोशल मीडियावर तृप्ती देसाई यांनी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडीओ बदनामी होईल अशा पध्दतीने सादर करुन, माझी व माझ्या पक्षाची, कुंटुब व अल्पवयीन मुलीची बदनामी होईल, अशा पध्दतीने प्रसिध्द केला. तसेच त्यासोबत खोटे आरोप करुन हेतूपुरस्सर माझी बदनामी केली आहे.
वास्तविक हा संपूर्ण व्हिडीओ न दाखवता त्याची एडिटींग करुन खोटे आरोप केलेले आहेत. सदर व्हिडीओ व्हायरल करुन माझी व माझ्या कुटुंबियांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितीन दिनकर यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत.




