मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेत त्यांच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आता राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ऑपरेशन टायगरबाबत भारतीय जनता पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत ‘ऑपरेशन टायगर’वरील चर्चांबाबत प्रतिक्रिया देत महत्वाचा खुलासा केला आहे. ‘ऑपरेशन टायगरशी भाजपाचा काहीही संबंध नाही’, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
ऑपरेशन टायगरशी भाजपाचा काहीही संबंध नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र, भारतीय जनता पक्षाचा या ‘ऑपरेशन टायगर’शी काहीही संबंध नाही. त्यामुळे या ‘ऑपरेशन टायगर’शी आमच्या नेत्यांना काही बोलणे योग्य नाही. ज्या विषयाशी संबंधित आम्हाला काहीही माहिती नाही, त्यामुळे त्याबाबत आम्हाला काही बोलणे योग्य नाही”, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
“उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, याबाबत कोणाचीही ना नाही. ज्यांनी-त्यांनी आप-आपल्या पक्षाचा निर्णय घ्यायचे असतात. आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे लोक का सोडून चालले? याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. मात्र, या विषयाशी तथा ऑपरेशन टायगरशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही”, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शिवसेना खासदारांचा गट विलिन
शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा अधिकृतरित्या आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या मंचावर जाऊन शक्तिप्रदर्शन करतील. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची प्रक्रिया अतिशय शांतपूर्वक राबविण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप काढण्याआधीच सहा फुटीर खासदारांचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानुसार ओम बिर्ला यांनी बुधवारी सकाळी फुटीर गटाला मान्यता दिली. त्यामुळे शिंदे शिवसेनेत त्यांच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.




