अहिल्यानगर । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते.
अहिल्यानगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी कामं केली. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळासह अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
शिवाजीराव कर्डीले यांचे बालपण अहिल्यानगर जिल्ह्यात गेले. त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शिक्षणापासून दुरावले. त्यांनी डेअरी व्यवसाय सुरू केला, ज्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर ओळख मिळाली.
शिवाजीराव कर्डीले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. ते राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामीण विकास, शेती आणि डेअरी क्षेत्रातील मुद्द्यांवर काम करायचे.





