राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर राज्यात भाजप अधिक मजबुतीने काम करून मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आ. रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल ना. विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या माध्यमातून संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. रविंद्र चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. कल्याण डोंबीवली महानगरपालिका आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी विजयाची घोडदौड सुरू केली. सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ते करीत आहेत. सार्वजनिक जीवनात विकास कामांच्या प्रक्रियेला पुढे नेण्याचा अनुभव तसेच एक कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राहिलेली संघटनात्मक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
महायुती सरकारमध्ये विविध मंत्रीपदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरी हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राधान्याने राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. सरकार आणि संघटना यामधील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आ. रविंद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपाच्या संघटनात्मक कामाला त्यांचे बहुमोल मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल, असेही ना. विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र राज्य करत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम पाठबळ उभे करून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विधानसभेप्रमाणेच भारतीय जनता पक्षाला प्रथम स्थानावर यश मिळवेल, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.





