मुंबई । Mumbai
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू असताना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीतून भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच भाजपच्या दोन महिला उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत पक्षाचे विजयाचे खाते उघडले आहे.
कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतून भाजपच्या दोन महिला उमेदवारांच्या विरोधात अन्य कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून रेखा चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला या आरक्षणासाठी राखीव आहे. या जागेसाठी केवळ चौधरी यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून सध्या त्या भाजपच्या कल्याण विभाग महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २६ ‘क’ मधून आसावरी नवरे यांनी नशीब आजमावले होते. खुल्या प्रवर्गातून त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या विरोधातही कोणीही प्रतिस्पर्धी रिंगणात न उतरल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, आसावरी नवरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
या दोन जागांवर मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून हा विजय म्हणजे भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे आणि जनमानसातील विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. रवींद्र चव्हाण यांनी या विजयाची माहिती तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून दिली. मुख्यमंत्र्यांनीही या दोन्ही नवनियुक्त नगरसेविकांचे अभिनंदन करत आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होत आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे असे चौरंगी-पंचरंगी सामने पाहायला मिळतील. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच दोन जागा खिशात घातल्याने भाजपने मानसिक आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. राजकीय वर्तुळात या बिनविरोध निवडीची जोरदार चर्चा सुरू असून, उर्वरित जागांवर आता कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




