नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगरपालिकेत मागील वेळी ६६ नगरसेवक होते आता ७६ झाले असून १० नगरसेवक वाढले आहेत. एबी फॉर्मचे वाटप करत असताना झालेल्या गोंधळामुळे १० त १५ जागा हातच्या गेल्या. तरीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्याचबरोबर राज्यातील इतरही महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून २९ पैकी २६ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशिकमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप, नाना शिलेदार, सरचिटणीस सुनील देसाई, गोविंद्र बोरसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, जळगाव महापालिकेत पक्षाने दिलेले ४६ पैकी ४६ उमेदवार निवडून आले असून तेथे आम्ही स्पष्ट बहुमतात आहोत. त्याप्रमाणे अहिल्यानगर येथेही महायुतीची सत्ता आली आहे. आता उत्तर महाराष्ट्रात आमदार, नगर परिषद, नगरपालिका आणि आता महापालिकांमध्येही निवडूण आल्याने १०० टक्के भाजपची सत्ता निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हणून लोकांनी बॅण्ड बाजवला
नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त विकासावर बोलले. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला. पण बोलबच्चन करणार्या सर्वांचा पराभव झाला. मीडिया समोर बडबड करण्यापेक्षा राज्यात फिरले असते तर त्यांच्या १० ते १५ जागा अजून निवडूण आल्या असत्या. लोकांना त्यांच्या या बडबडीचा वीट आला होता. म्हणून लोकांनी त्यांचा बॅण्ड वाजवल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
आयात केलेले सर्व निवडूण आले
तपोवनातील मुद्द्यावर टीका करणारे डाव्या विचाराचे होते. त्यांनी हा मुद्दा अकारण मोठा केला. त्यात अनेकांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण लोकांचा विश्वास भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकच्या स्थानिक नेत्यांवर आहे. एबी फॉर्मच्या गोंधळावर भाष्य करताना १०७ तिकिटे बरोबर दिले गेले. शेवटच्या १० ते १२ तिकिटांबाबत गोंधळ झाला. शिवसेनेने उमेदवारी दिलेल्यांपेकी ७५ टक्के उमेदवार आमचे पदाधिकारी आहेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले सर्व निवडून आले आहेत. झालेले निर्णय योग्य झाले त्याचा फायदा निश्चित झाला.
भाजपचा उच्चांक भाजपनेच मोडला
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचा उच्चांक भाजपनेच मोडला. गेल्यावेळी ६६ नगरसेवक निवडूण आले होते. आता ७६ निवडूण आले आहेत. प्रत्येकवेळी पक्षाने विकासाचे राजकारण केले म्हणूनच नाशिकमध्ये हे घवघवीत यश मिळाले आहे.
सुनील केदार, अध्यक्ष, महानगर जिल्हा अध्यक्ष




