मुंबई । Mumbai
आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित क्रिकेट सामना आज (रविवार) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
एकीकडे देशभरात सामन्याची उत्सुकता असताना, दुसरीकडे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळला जात असल्याने यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेने (ठाकरे गट) या सामन्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर तीव्र टीका केली आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. “पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामन्यावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना नैतिक अधिकार नाही,” असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या महिलांकडून ‘सिंदूर’ पाठवण्याबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली.
बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी कधीही खेळाला द्वेष किंवा राजकारणाशी जोडले नाही, उलट त्यांनी नेहमीच खेळाला प्रोत्साहन दिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून राजकारण करत आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख करत त्यांना घेरले. “देशावर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी उद्धव ठाकरे परदेशात पर्यटन करत होते. ते तात्काळ भारतात परत येऊ शकले असते, पण १०-१२ दिवस लंडनमध्येच राहिले. आता ते क्रिकेट सामन्याच्या नावाखाली राजकारण करत आहेत,” असे बावनकुळे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो, पण देश त्यांच्या या राजकारणाला पाठिंबा देणार नाही.”
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. “उद्धव ठाकरे यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, त्याचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे,” असे म्हणत बावनकुळेंनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे आणि या परिस्थितीत होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे, तर भाजपच्या नेत्यांनी याला राजकारण संबोधून विरोधकांनाच लक्ष्य केले आहे.




