धुळे |
येथील महापालिका निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. तब्बल ५० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपाने सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांसह सर्व विरोधकांना पिछाडीवर टाकले. मतदानाआधी चार जागांवर बिनविरोध विजय मिळविल्यानंतर मतमोजणीतही भाजपाचा विजयी रथ कायम राहिला. तर एमआयएमने १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ८ जागांवर विजय मिळविला.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडली. प्रभागनिहाय मतमोजणी करण्यात आली. अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे संपूर्ण पॅनल विजयी झाले. काही प्रभागांमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी तोडीची लढत दिली असली तरी निर्णायक जागांवर यश मिळविण्यात त्यांना अपयश आले.
एकूण निकालातून शहराने भाजपाला स्पष्ट बहुमत देत महापालिकेची सत्ता सोपविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेेनेने ४ व प्रभाग १९ मध्ये अपक्ष उमदेवार विजयी झाला आहे. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत एक जल्लोष केला. विशेष म्हणजे प्रभाग क्र. 17 मध्ये भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती शितल कुमार नवले व सुनंदा माळी यांना यांना प्रराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे धीरज कलंत्री व लता नवले या विजयी झाल्या.




