अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
काळ्या काचा व ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांमुळे गुन्हेगारी कृत्यांना चालना मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात जिल्हा पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम 28 जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून पुढील काळातही ती सातत्याने सुरू राहणार आहे. आतापर्यंत शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी कारवाई करत 136 ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून एकूण 1 लाख 28 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म जागेवरच काढून घेण्यात आली आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 100 नुसार वाहनांच्या पुढील व मागील विंडस्क्रीन तसेच बाजूच्या खिडक्यांच्या काचांमधून किमान 70 टक्के दृश्य स्वरूपातील उजेड येणे बंधनकारक आहे. तसेच या काचा भारतीय मानक नुसार असणे आवश्यक आहे. वाहन उत्पादक कंपनीकडूनच नियमांनुसार पारदर्शक काचा बसविणे अपेक्षित असून वाहन उत्पादनानंतर कोणत्याही प्रकारची ब्लॅक फिल्म, रंगीत काचा किंवा इतर साहित्य काचांवर चिकटविण्यास सक्त मनाई आहे. ब्लॅक फिल्म असलेली वाहने अनेकदा गंभीर गुन्हे तसेच गैरकृत्यांसाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर चलन करून संबंधित फिल्म तात्काळ काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नगर जिल्हा पोलीस दल व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची जिल्हा नियंत्रक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहर वाहतूक नियंत्रण शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत.





