शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असलेल्या व बदली प्रक्रियेत इतरत्र बदलून गेलेल्या शिक्षकांच्या जागेवर नवीन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमतांना पंचायत समितीचा शिक्षण विभाग व तहसिल कार्यालयातील निवडणुक शाखा यांच्यात समन्वय नसल्याने त्याचा फटका तालुक्यातील अनेक मुख्याध्यापकांना बसला आहे.
अनेक प्रभारी मुख्याध्यापकांच्याच नियुक्त्या बीएलओ म्हणून करण्यात आल्याने आधीच अवांतर माहित्या व शालाबाह्य कामांनी त्रस्त असलेल्या प्रभारी मुख्याध्यापकांना शिक्षण विभाग व निवडणुक शाखेने वेठीस धरण्याचा प्रकार केला आहे.
जिल्हा परीषदेतील शिक्षकांची बदली प्रक्रीया मे महिन्यात पार पडली. त्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असलेल्या तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या इतरत्र झाल्या आहेत. अशा बदलून गेलेल्या 47 बीएलओ शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक नियुक्त करण्याचा आदेश नुकताच काढण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये ज्या शिक्षकाची बदली झाली. त्या शिक्षकांच्या जागी बदलून आलेल्या शिक्षकास मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे आदेश देणे आवश्यक होते. मात्र तहसिल कार्यालयातील निवडणुक शाखा व पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने त्याचा फटका अनेक प्रभारी मुख्याध्यापक व विशेषतः महिला शिक्षकांना बसला आहे.
निवडणूक शाखेने फक्त बदलीत बीएलओ शिक्षकांच्या जागी बदलून आलेल्या शिक्षकांची माहिती मागितली असताना शिक्षण विभागाने कार्यरत इतर सर्वच शिक्षकांची माहिती दिली. त्यामुळे निवडणूक शाखेने देखील त्याची शहानिशा न करता नेमणूकांचे आदेश दिले. त्यामुळे शालेय कामकाज, विविध माहित्या, मिटींग, समित्यांच्या बैठका, इतिवृत्त लेखन, आर्थिक अभिलेखे, प्रशिक्षण, अॅानलाईन कामे, शालेय पोषण आहार या कामाने आधीच त्रस्त असलेल्या मुख्याध्यापकांना अतिरिक्त ताण आला आहे. अनेक ठिकाणी शाळेवर कार्यरत एकमेव शिक्षकांना, पुरुष कर्मचारी असताना महिलांना देखील आदेश दिले आहेत.त्यामुळे या नियुक्त्या देतांना इतर पर्याय वापरण्यात यावेत. अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
इतर विभागाचे कर्मचारी देखील गावात उपलब्ध असतांना प्रत्येक वेळी शिक्षक व मुख्याध्यापक यांनाच निवडणुक शाखेकडून कामाला जुंपले जाते. त्यामध्ये विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत प्रभारी मुख्याध्यापक व महिला शिक्षकांचे आदेश तातडीने बदलण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
रमेश गोरे, प्राथमिक शिक्षक बँक संचालक