वसुंधरा दिनाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे यावर्षी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु COVID-19 च्या संकटामुळे आपली पृथ्वी/पर्यावरण या विषयी प्रेम आणि काळजी असणाऱ्यांनी सोशल डिस्टंसिन्ग पाळून वैयक्तिक उपक्रम राबवावेत असं आवाहन ‘अर्थ डे नेटवर्क’ तर्फे करण्यात आलं आहे. या वर्षीची संकल्पना ‘क्लायमेट ऍक्शन’ अर्थात हवामाना संदर्भात जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे.
सध्या लॉकडाऊन मुळे अनेकांच्या काव्यप्रतिभेला,विनोदबुद्धीला,कल्पकतेला बहर आला आहे. कोणीतरी मास्क लावलेली पृथ्वी दाखवली होती. खरं तर प्रदूषणाचे प्रमाण असंच वाढत राहिलं तर कायमच सगळ्यांना मास्क लावून फिरावं लागेल. वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. भिन्न पार्श्वभूमी, श्रद्धा, विश्वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. एक अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात. गेल्या 50 वर्षांपासून दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. १९७० च्या दशकामधील आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म हा दिवस साजरा करण्यातूनच झाला, असे अनेक जण मानतात. त्या काळात अमेरिकन लोक ‘व्ही ८ सेडन’ हे भले मोठे वाहन वापरत असत. या वाहनातून वातावरणात सोडला जाणारा धूर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करत असे. त्याचप्रमाणे कारखान्यातूनही अनिर्बंधपणे वातावरणात विषारी धूर आणि कसल्याही प्रक्रियेविना रसायनमिश्रित पाणी आसपासच्या परिसरात सोडले जात असे. पर्यावरणविषयक चिंता अमेरिकेतील मुख्य प्रवाहाच्या गावीही नव्हती. मात्र, सन १९६२ मध्ये सागरी जीवशास्त्रज्ञ राचेल कार्सन लिखित ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक न्युयार्क टाईम्सने प्रकाशित केले. या पुस्तकाच्या माध्यमातून कार्सन यांनी सजीव, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य यासंदर्भात केलेली जनजागृती ही तोपर्यंतच्या कोणत्याही इतर व्यक्तीच्या तुलनेत खूप अधिक होती. या वाढत्या जागृतीमधूनच सन १९७० मध्ये ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्याची कल्पना पुढे आली. ही वसुंधरा दिनाची कल्पना सर्वप्रथम गेलॉर्ड नेल्सन यांनी मांडली. नेल्सन हे त्यावेळी अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्याचे सिनेटर (खासदार) होते.
अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धाला अमेरिकेतील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला. यातून युवा शक्तीचा जोश आणि तिची ताकद देशातील नागरिकांना अनुभवायला मिळाली. सन १९६९ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता बार्बारा येथे प्रचंड प्रमाणात तेलगळती झाली. त्याच्या निषेधार्थ जनतेने मोठ्या प्रमाणात केलेली नासधूस आणि लुटालूट नेल्सन यांनी पाहिली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या युद्धविरोधी चळवळीपासूनही त्यांना प्रेरणा मिळाली होती. नेल्सन यांच्या लक्षात आले की, जल आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला, तर पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर घेणे सरकारला भाग पडेल. नेल्सन यांनी पर्यावरणावर राष्ट्रीय शिकवण देण्याची आपली कल्पना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली. आपल्याबरोबर सहअध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी रिपब्लिकन काँग्रेसच्या पीटी मॅकक्लोस्की यांना राजी केले आणि राष्ट्रीय समन्वयक म्हणून डेनिस हेज यांना सहभागी करून घेतले. हेज यांनी देशभर सर्वत्र यासंदर्भात कार्यक्रम करण्यासाठी ८५ कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. परिणामी, २२ एप्रिल रोजी पहिल्या वसुंधरा दिनानिमित्त निरोगी, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासाठी एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत, रस्त्यांवरून, बागांमध्ये फेऱ्या काढण्यात आल्या.
पर्यावरणाच्या नासाडीविरोधात यावेळी निदर्शनेही करण्यात आली. या सर्व कार्यक्रमांमध्ये दोन कोटींहून अधिक अमेरिकन सहभागी झाले. यामुळे तेलगळती, कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, विनाप्रक्रिया विषारी पदार्थ फेकून देणे, कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलांचा, मोकळ्या जागांचा आणि वन्यसृष्टीचा नाश या सर्वांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढणाऱ्या छोट्या छोट्या गटांच्या लक्षात आले, की आपण सारेजण एकाच उद्दिष्टासाठी लढत आहोत. क्वचितच दिसणारे राजकीय पक्षांचे ऐक्य १९७० मध्ये वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पहावयास मिळाले. या एकमताच्या जोरावर पहिल्या वसुंधरा दिनी ‘युनायटेड स्टेट्स एन्व्हायरन्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ची स्थापना झाली, तसेच स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि नामशेष होऊ पाहणाऱ्या प्रजातींसाठी कायदे करण्याचा मार्ग मोकळा झाला.
सन १९९० मध्ये पर्यावरणवादी गटाच्या नेत्यांनी डेनिस हेज यांना आणखी एक मोठी मोहीम आखण्यास सांगितले. या मोहिमेत १४१ देशांतील वीस कोटींहून अधिक लोक सहभागी झाले. सन १९९० च्या वसुंधरा दिनामुळे टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या (रिसायकलिंग) विषयाला जागतिक पातळीवर चालना मिळाली. सन २००० मध्ये वसुंधरा दिनानिमित्त डेनिस हेज यांनी आणखी एक मोहीम हाती घेण्याचे मान्य केले. जागतिक तापमानवाढ हा विषय केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. एकूण १८४ देशांतील ५ हजार पर्यावरणवादी गट आणि कोट्यवधी लोक यात सहभागी झाले. जगभरच्या नागरिकांना स्वच्छ उर्जेसाठी तात्काळ, ठाम कृती हवी आहे, हा संदेश जगभरातील नेत्यांपर्यंत पोहोचला.
कार्बन उत्सर्जनात कपात करणे आणि त्यासाठी शाश्वत स्वरूपाचे पाठबळ मिळवून देणे या उद्देशाने सन २०१० मध्ये ४० व्या वसुंधरा दिनानिमित्त ‘ए बिलियन अॅक्ट्स ऑफ ग्रीन’ या मोहिमेअंतर्गत सन २०१२ पर्यंत चार कोटी लोक सहभागी झाले. हवामान बदल दिवसेंदिवस स्पष्टपणे जाणवू लागल्यामुळे स्वच्छ पर्यावरणाची गरज अधिक तातडीने अधोरेखीत होऊ लागली आहे. वाढते प्रदूषण ही (भूतानसारखा एखादा प्रदूषणमुक्त देश सोडला तर) सगळ्याच देशांची समस्या आहे, भारतासारखा विकसनशील आणि जास्त लोकसंख्येच्या देशात तर याचा खूपच गांभीर्याने विचार व्हायला हवाय.दुर्दैवाने बहुतेक नागरिक हे सरकारचे किंवा सामाजिक संस्थांचे काम आहे असेच समजतात. प्रदूषण थांबवण्यासाठी, निदान वाढू न देण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे. यासाठी अगदी “साधा कॉमनसेन्स” वापरून उपाय करता येतील. वीज- अनावश्यक असेल तेव्हा घर, कार्यालय,सार्वजनिक ठिकाणीही पंखे, हिटर, गीझर,एअरकंडिशनर, लाईट बंद केलेच पाहिजेत.वीज बचती बरोबरच विजेच्या उपकरणांमुळे वातावरणातली वाढणारी उष्णताही कमी होईल.
पाणी- पाणी वाचवण्याचे संदेश नुसते अंगठे दाखवून पुढे पाठवण्यापेक्षा ते अमलात आणले पाहिजेत. पाणी पिण्याचे भांडे जेव्हढे पाणी हवे तेव्हढेच भरणे- एव्हड्या कमी प्रमाणातील बचतीपासून वाहणारे नळ, टाक्या अश्या प्रकारची उधळपट्टी स्वतः टाळून दुसऱ्यांनाही तसे करायला सांगितले पाहिजे. निर्माल्य,कचरा- नदी ,तलावात टाकतांना (तिथे टोकणारे कुणी नसले तरी) हात थांबलेच पाहिजेत. हवा- शक्य तिथे गाडी ऐवजी पायी/ सायकलवर जाणे, सार्वजनिक वाहनाचा वापर करणे,कार पुलिंग असे अनेक उपाय इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सामान्य माणूस करू शकतो. सध्या काही दिवस रस्त्याने वाहने कमी जात असल्यामुळे हवा शुद्ध वाटते,पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात असा अनेकांचा अनुभव आहे. आपण अनावश्यकही बऱ्याचवेळा वाहन वापरतो, फिरतो असेही लक्षात आले.धूर पेट्रोलची उधळपट्टी,प्लास्टिक पार्सल कमी झाले. काही प्रमाणात भान ठेवून एरवीही आपण असं करू शकतो. छोट्या छोट्या कृतीतून ध्वनी,वायू,जल, मृदा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे,स्वतः प्रदूषण करणार नाही हे ठरवण्याबरोबरच कोणी प्रदूषण करतांना दिसले तर ते थांबवण्यासाठी “आपल्याला काय करायचंय”ही वृत्ती सोडून प्रयत्न करायलाच हवे. पुढच्या पिढयांना स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळण्यासाठी तरी एकमेवाद्वितीय अश्या आपल्या निळ्या ग्रहावरची हिरवाई जपली आणि समृद्ध केली पाहिजे.
राधिका गोडबोले
९४२३२२४२११