भारतीयांनी पश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केलं. मात्र माणूस म्हणून आजही प्रगल्भतेकडे वाटचाल झाली नाही. समाज शिक्षित झाला म्हणजे प्रगल्भ होण्याची अपेक्षा असते. परंतु भारतीय लोकांची मानसिकता अजुनही शेकडो वर्षे पाठीमागे चाचपडत आहे. स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या दहशतीने आजही प्रेम करणार्या जोडप्याचा बळी जातो. अशा घटनांची काही दिवस ब्रेकिंग न्यूज होते. सोशल मिडियावर हळहळ, निषेद व्यक्त केला जातो. त्या घटनेचं मुल्य संपलं कि तो विषय मागं पडतो.
31 जानेवारीला महाराष्ट्राला सुन्न करणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली. फिरायाला आलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्याची बातमी बनल्यावर पोलिसांनी घटनेची दखल घेतली. या व्हिडिओत जोडप्याला मारहाण करताना काही तरूण दिसत आहेत. मुलगा आणि मुलगी एकत्र आले म्हणजे काहीतरी अघटित घडणार. या मानसिकतेतून असे प्रकार घडतात. हे लोक विसरतात की, मुलगा आणि मुलगी चांगले मित्रही असू शकतात.
आपल्या समाजात सेक्स हा विषय खुप संवेदनशील आहे. त्यामुळे या विषयावर कोणी उघडपणे बोलत नाही. शाळेत सेक्स एज्युकेशन द्यायला लोकांचा विरोध आहे. त्यामुळे समाज आजही लैंगिक शिक्षणात अडखळत वाटचाल करतो आहे. सेक्स एज्युकेशन नसल्याने मुलं वाटेल त्या मार्गाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्या अज्ञानातून विकृत घटना घडतात. त्यामध्ये मुलांचे आयुष्य आणि ते कुटुंब उधवस्त होते.
समाज शिक्षित असला तरी लोकांमधील जातीय आणि धार्मिक कट्टरता कमी झाली नाही. प्रेमविवाह केला म्हणून कुटुंबाकडून तरुणाची किंवा तरुणींची हत्या झाल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. या खोट्या प्रतिष्ठेपाई सैराट सिनेमातील आर्ची आणि परश्याच्या हत्याकांडासारख्या घटना घडत आहेत. गेल्यावर्षी बीडमध्ये बहिणीनं प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या पतीची कॉलेजच्या गेटवर हत्या केली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
तेलंगणामध्ये एका घटनेत 22 वर्षीय मुलीची वेगळ्या जातीच्या मुलाशी लग्न केले म्हणून तिच्या वडिलांनी तिची हत्या केली होती. पंढरपूर येथे सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने 22 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणार्या अनुराधाची तिच्या कुटूंबियाने हत्या केली. घाटकोपर येथे मीनाक्षीने मनाविरुद्ध लग्न केल्याने पित्याने गर्भवती असलेल्या मुलीची हत्या केली. कराड येथे पवार कुटुंबीयाने मुलीने प्रेमविवाह केला म्हणून रेल्वेखाली आत्महत्या केली. चिंचवड मध्ये ऋतुजाने प्रेमविवाह केल्याने चुलतभावाने खून केला. अहमदनगर येथील आंतरजातीय मुलाशी विवाह केल्याने मुलीच्या कुटूंबियाने रुख्मिनीचा रॉकेल ओतून खून केला.
एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, खून, बलात्कार, ऍसिड अटॅकसारख्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामध्ये बळी जातो तो मुलीचा. अमरावती शहरात अर्पिता नावाच्या मुलीचा तिच्या प्रियकराने एकतर्फी प्रेमातून हत्या केली. नागपूर येथील टेक्स्टाईल इंजिनिअरींगच्या सानिकाची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली होती. तसेच इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले म्हणून मुलींनी आत्महत्या केल्याचे उदाहरणं आहेत. शाळा, कॉलेजमधून विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्षतेचे धडे गिरवणारा प्राध्यापक तसेच व्यक्ती स्वतंत्र्यासाठी शाई खर्ची घालणारा लेखक मात्र स्वतःच्या कुटूंबाविषयी वेगळी भूमिका घेतो. त्याला सून किंवा जावई स्वःजातीचा असावा वाटतो.
प्रेम विवाह करणार्या जोडप्याला युद्धातील सैनिकापेक्षा अधिक संघर्ष करावा लागतो. (सैनिकांना कमी लेखण्याचा हेतू नाही) सैनिकांचा युद्धात शत्रू ठरलेला असतो. दोन्ही देशाचे काही नियम असतात. युद्धात मृत्यू झाला. त्याचा शाहिद म्हणून गौरव होतो. तसं प्रेमविवाह करणार्याला आयुष्यभर अपमानित जीवन जगावं लागतं. अगोदर कुटूंबाबरोबर संघर्ष करावा लागतो. नंतर समाजाबरोबर. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून त्या कुटूंबाला वाळीत टाकण्याच्या घटना घडतात. अशा दुर्दैवी घटना फक्त ग्रामीण भागात घडतात असेही नाही. पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरात देखील घडतात.
व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर येवून ठेपला आहे. आता अनेक स्वयंघोषित संस्कृती रक्षक जागे होतील. एकत्र फिरणार्या जोडप्याना दमदाटी किंवा मारहाण केल्याचा घटना ऐकायला मिळतील. काही दिवसांपूर्वी नगरमध्ये एक कॉलेजचं जोडपं फिरायला गेलं होतं. त्या ठिकाणी टुकार मुलांचा ग्रुप होता. ते तरुण यांच्याकडे पाहून अश्लिल कमेंट करत होते. त्यामुळे त्यांनी तिथं असलेल्या पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत, या दोघांची उलट तपासनी सुरू केली. त्यामध्ये संधी शोधून तो तरूण पळून गेला. आणि काही अंतरावर त्याचा अपघात झाला.
महर्षी वात्सायन यांनी स्त्री-पुरुषांमधील लैंगिक व इतरक्ष संबंधावर कामसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. माणसाच्या कामजीवनावर लिहिलेला हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. परंतु नंतरच्या काळात भारतीय लोक स्त्री-पुरुषांतील लैंगिक संबंधाकडे संकोचितपणे पहायला लागले. वयात आलेल्या मुलाला आणि मुलीला एकमेकांचे आकर्षण असणं ही नैसर्गिक बाब आहे, याचा विसर पडला. समाज शिक्षित झाला म्हणजे प्रगल्भ होईलचं याची शाश्वती नाही, असं खेदाने म्हणावं लागतं.
– प्रशांत शिंदे
9673499181