Friday, May 3, 2024
Homeब्लॉगBlog : फिरकीचा जाणता राजा

Blog : फिरकीचा जाणता राजा

ज्या गोलंदाजामुळे जगभरचे क्रिकेट रसिक फिरकीच्या प्रेमात पडले त्या बिशन पाजींचे वयाच्या सत्त्याहत्तरव्या वर्षी सोमवारी निधन झाले. क्रिकेटमधले एक निखळ आनंद देणारे, गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपले. बिशनसिंग बेदींच्या आधीही डावखोरे मंदगती गोलंदाज होते, पण बिशन पाजींची खासियत हीच की, त्यांनी आमच्या पिढीला फिरकीबरोबरचा रोमान्स शिकवला. त्यांना गोलंदाजी करताना पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद होता. कोणीतरी म्हणाले होते, क्रिकेटमधला सर्वोच्च आनंद म्हणजे एका एंडने रे लिंडवॉल तर दुसऱ्या एंडने बिशनसिंग बेदीला गोलंदाजी करताना पाहणे! त्यांची गोलंदाजीची शैली म्हणजे गुलजार साहेबांची आगळी नजाकत असलेली शेरोशायरी होती.

छोटासा स्टार्टअप, अतिशय ‘लाघवी’ गोलंदाजीची स्टाईल, त्यांना चेंडू टाकताना पाहणे म्हणजे सुहास बहुलकरना पेंटिंग करताना पाहण्याची अनुभूती! चेंडूला उंची द्यायचे आगळे कसब, त्यात ते अप्रतिम बदल करीत फलंदाजाला गोंधळात टाकत आणि भसकन आत घुसणारा आणि स्टंपचा कोथळा एका क्षणात बाहेर काढणारा आर्मर ही त्यांची अस्त्रे! स्पिनवरचा त्यांचा मजबूत कंट्रोल! तो सहा वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करायचा आणि फलंदाजाला बुचकळीत टाकायचा असे माजी विकेटकिपर सय्यद किरमानी म्हणायचा. माईक ब्रेअरली त्यांचे कौतुक एक शब्दात करतो…. मोस्ट ब्युटीफुल! सर डॉन ब्रॅडमन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट डावरा गोलंदाज’ मानतात. त्यांची ऍक्शन साधी होती म्हणून की काय, ती कोणालाही कॉपी करता आली नाही. सर्व हक्क त्यांच्या स्वाधीन असायचे. त्यातच त्यांची क्षमता खूप मोठी… म्हणून की काय, ते खूप मोठे स्पेल टाकायचे. त्या काळात शारीरिक तंदुरुस्तीला फारसे महत्त्व नव्हते, पण बिशन पाजी भरपूर शारीरिक व्यायाम करायचे. योगा करायचे आणि स्वतःला फिट ठेवायचे. दीर्घायुषी टेस्ट करिअर हे या व्यायामाचे फलित होते.

- Advertisement -

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बिशनसिंग बेदींच्या काळात भारताचे आक्रमण फिरकी गोलंदाज करीत. चवीलाही फास्ट बॉलर नसायचे. कधी गावस्कर, कधी जयसिंह तर कधी वाडेकर; कोणीही जलदगती गोलंदाजीची पहिली दोन तीन षटके टाकायची. यष्टिरक्षक बुधी कुंदरनसुध्दा नवा चेंडू हाताळायचा. मग यायचे आमचे स्पिनर. प्रसन्न, वेंकट राघवन, चंद्रशेखर आणि अर्थातच बिशनसिंग बेदीदेखील! १९६९-७० ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारतातील मालिका गाजवली प्रसन्ना बेदीने. १९७१ मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडीज आणि मग इंग्लंड यांच्यावर सिरीज विजय मिळवले ते मुख्यतः दुराणी, चंद्रा आणि वेंकटमुळे! भारतातही १९७२ मध्ये इंग्लंडला लोळवताना बेदी यांनी मुख्य रोल निभावत या त्रिकुटाची साथ घेतली.

हे दिवस म्हणजे फिरकीचे सुवर्णयुग होते. त्यानंतर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया दौरे त्यांनी गाजवले. १९७७ च्या मालिकेत मायदेशात लिवरने वासेलिन लावून चेंडू सिम करून भारताला हरवले. तेव्हाही बेदी गोलंदाज म्हणून चाललेच, पण इथेच फिरकीचा ऱ्हास सुरू झाला. आमच्या चौकटीचा दरारा कमी झाला तो इम्रान खान, झहीर अब्बास असलेल्या पाकिस्तानकडून. बऱ्याच वर्षानंतरच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे, पण कसोटी क्रिकेटमध्ये ६७ कसोटी २६६ बळी ही कामगिरी विलक्षण प्रभावी होती, असे निश्चित म्हणावे लागेल.

बेदी यांनी २२ कसोटीत भारताचे नेतृत्व देखील केले आणि बऱ्यापैकी यशही त्यांना मिळाले, पण बेदी पाजी प्रसिद्ध होते ते त्यांच्या भडक बोलण्यामुळे! निवृत्तीनंतर तर ते आपल्या कळत-नकळत विविध वादविवादांत बुडून गेले. कोच म्हणून न्यूझीलंडला गेले असताना हरल्यावर या भारतीय संघाला समुद्रात बुडवले पाहिजे असे काही बोलल्याचे मला आठवतेय. मुरलीधरन यांच्या शैलीबद्दल त्यांचे वक्तव्य फार गाजले होते. ते मुरलीला गोलंदाज मानायलाच तयार नव्हते. तो जवेलिन थ्रो करतो, असे ते म्हणायचे. त्याने कसोटीत  घेतलेले बळी ‘रन आउट’ म्हणून गणले जावेत, असे स्पष्ट प्रतिपादन ते करीत असत. मुरलीने त्यांना अब्रूनुकसानीचा दावा लावू म्हणून दम दिला होता, पण बिशन बेदी कशालाच बधले नाहीत. त्यांनी भज्जीलादेखील ‘चकर’ म्हटले होते. ‘दूसरा’ टाकणारा प्रत्येक गोलंदाज चकर असतो, असे ते म्हणायचे. दिल्लीत अरुण जेटली यांचा पुतळा स्टेडियममध्ये लावण्याच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केली होती, पण ही झाली त्यांची एक बाजू! नव्या पोरांना शिकवायचा त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. अगदी परकीय संघातल्या खेळाडूंना ते सल्ला द्यायचे. इंग्लंडचा डेनिस अमिस तर त्यांचा बनी होता. त्याने त्यांच्याकडे जाऊन डावरा स्पिन कसा खेळावा याचा सल्ला मागितला. बेदींनी काय करावे?त्यांनी नेट्समध्ये त्याला गोलंदाजी केली आणि कसे खेळावे हे शिकवले.   याच अमिसने त्यानंतर १९७४ च्या दौऱ्यात भारतीय फिरकीची पिसे काढली.

बेदी फक्त त्यांच्या काळातच नव्हे तर सर्वकालीन श्रेष्ठ डावखोरा मंदगती गोलंदाज होते. इंग्लंडचा डेरेक अंडरवुड लेफ्टी होता, पण फास्टिश स्पिनर होता. विनु मांकडना पाहायचा योग आला नाही, पण ते फलंदाजीत तेवढेच वाकबगार होते. बिशन बेदी आले की, भारताचा विकेटकिपर मैदानावर निघायच्या तयारीला लागायचा.

आजकालचे फिरकी गोलंदाज चेंडूला उंची द्यायला तयार नसतात. ते फ्लॅट गोलंदाजी जास्त करतात. कारण धावा रोखणे हे त्यांचे पहिले काम असते. ते करताना बळी मिळाले तर आनंद, अशी त्यांची मानसिकता असते. एखादा अश्विन त्याला अपवाद. म्हणून वाटते, बेदींसारख्या ‘फिरकीच्या जाणत्या राजा’बरोबरच आमचा फिरकीबरोबरचा डिसेंबर रोमान्सही संपला.

– डॉ अरुण स्वादी

- Advertisment -

ताज्या बातम्या