हिचा जन्म चाळीतला… मुंबईच्या भरवस्तीतील एक चाळ. वडील कुठल्याशा एका फॅक्टरीत वॉचमन आणि आई दोन घरी स्वयंपाकाचे काम करी. तिच्या जन्माआधी दोन दिवस त्यांनी नूतनचा एक चित्रपट पाहिला होता, म्हणून हिचे नाव नूतन ठेवले.
तिने शिकावे अशी दोघा आईबापांची खूप इच्छा! त्यांना नंतर मूल झाले नाही. पोर चुणचुणीत होती. तिला सरकारी शाळेत टाकले त्यांनी.
बारावीनंतर तिने नर्सिंगचा कोर्स केला आणि छान पैकी मार्क्स मिळवून पास झाली. सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला नोकरी पण मिळून गेली.
तिच्या मनमिळाऊ वृत्तीमुळे ती डॉक्टर्सपासून ते पेशंटपर्यंत सगळ्याचीच ती लाडकी बनली. दिसायला फारशी सुंदर वगैरे नव्हती पण सडसडीत बांधा आणि काळेभोर लांब सडक केस यामुळे आकर्षक वाटे.
आता तिचे लग्न होऊन जावे अशी सहाजिकच तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. मुलगी कमवती आहे म्हटल्यावर लवकर स्थळ मिळेल अशी त्यांची भाबडी आशा! पण हुंडा आड येऊ लागला. आमचा मुलगाही शिकलेला आहे मग त्याची किंमत नको का ? ही वृत्ती! दिवस जात होते.
हॉस्पिटलच्या एका सीनियर डॉक्टरला ही स्थिती समजली. त्यांनी तिच्यासाठी स्थळ म्हणून आपल्या ड्रायव्हरचे नाव सुचवले. तोही शिकलेला होता आणि त्याची हुंड्याची अपेक्षाही नव्हती. पुढे जाऊन आपण अजून काहीतरी धंदा करू असा त्याला विश्वास होता. खरंतर स्वतःची टॅक्सी घेऊन ती चालवावी अशी त्याची मनापासून इच्छा होती.
नूतनने ही गोष्ट आपल्या घरी सांगितली आणि घरचे खुश झाले. दोन्ही कुटुंबे भेटली. मुलगा-मुलगी भेटली व लग्न ठरले आणि झालेही. मुलगा रघु, त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या दोन खोल्यांमध्ये रहात होता. तिथेच तिने सुरुवातीचे दिवस काढले. नंतर रघुने एका बिल्डिंगमध्ये दोन खोल्या घेतल्या. मालकांनी कर्ज दिले होते त्यातून. त्याने बँकेकडून कर्ज घेऊन एक टॅक्सी देखील विकत घेतली आणि फावल्या वेळात तो टॅक्सी चालवू लागला.
सगळे कसे छान, व्यवस्थित चालले होते. नूतन सुखी होती. सासरच्यांचा जाच नव्हता. मूल होऊ देण्यासाठी ती दोघं समंजसपणे दोन वर्षे थांबली. दोन वर्षांनी नूतनला दिवस गेले आणि दोन्ही घरी आनंदी आनंद झाला. ठरल्यावेळी नूतनचे सुरळीत बाळंतपण झाले आणि तिलाही पहिली मुलगीच झाली. गोड, गोंडस! रघुच्या आईसारखी!
कले कलेने वाढू लागली. ती तीन महिन्यांची होईपर्यंत नूतनने सुट्टी घेतली होती. नंतर आपल्या सासूकडे ती तिला सोडून नोकरीला जाऊ लागली. नाव ठेवले होते माधुरी.. पण लाडाने सगळे तिला मधुच म्हणत.
हिला मात्र आपण कॉन्व्हेंट मध्ये शिकवू आणि मोठी डॉक्टर करू अशी नूतन व रघुची इच्छा! हुशार माधुरी इंग्रजी शाळेत शिकू लागली. शाळेची बस तिला घ्यायला येई. सगळी ऐट!
नूतन आपल्या नोकरी व संसारात खुश होती. रघु डॉक्टरांचीही नोकरी करीत होता आणि फावल्या वेळात टॅक्सी देखील चालवत होता. आपण एक बेडरूम, हॉल व किचनचा फ्लॅट घेऊ शकू असा त्याला विश्वास होता व तशी बचतही करीत होता.
आणि दैवाने घाला घातला! त्याचा अपघात झाला! भरधाव जाणार्या ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक त्याच्या टॅक्सीवर आदळला! टॅक्सी आणि रघु दोघेही चकनाचूर झाले!
नूतन कामावर होती. तिला दवाखान्यात पोलिसांचा फोन आला. ती भोवळ येऊन पडली! काय स्वप्ने पाहिली होती आणि काय झाले? तिथल्या इतर नर्सेसनी तिला सावरले मात्र आपल्यासमोर आपले सगळे आयुष्य पडले आहे हेही तिला कळत होते! फक्त तिचेच नाही तर तिच्या लेकीचे देखील! आता लेकीच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी तिची होती!
फ्लॅटचे स्वप्न अधुरेच राहिले. पण आता नूतननेे आपले सगळे लक्ष लेकीच्या संगोपनाकडे वळवले. तिला काय हवे नको हेच तिचे विश्व बनले. नोकरी सुरुच होती. ती नोकरीवर असताना माधुरीकडे तिची सासू लक्ष ठेवीत असे. तिला तिच्या सासू-सासर्यांकडे बघूनही खूप वाईट वाटे. एकुलता एक मुलगा होता आणि तोही गेला. तरीही त्या माय बापाने आपल्या सुनेला व नातीला पोटाशी धरले होते. त्यांच्याही घरची गरीबीच होती.
दिवस-महिने-वर्षे सरत राहिली. मधु अभ्यासात खूप हुशार होती. शाळेत तिचे फार कौतुक होत असे. पण हळूहळू ती गर्विष्ठ व्हायला लागली आहे असे नूतनला जाणवले. ती मधूनच लेकीला तसे सांगायची. तिला आठवण करून देत असे की शिकून तिला आपल्या पायावर उभे राहायचे आहे. रूप हेच सर्व काही नाही. स्वाभिमान असावा पण गर्व नाही!
आई, तुला माझे काहीच कौतुक नाही! तुझे सगळे लक्ष मी किती अभ्यास करते याकडेच असते. असे ती आईला म्हणत असे.
हे बघ, माझे ध्येय तुला तुझ्या पायांवर उभी करणे हे आहे. तुझी शक्य होईल तितकी हौस मी पुरवितच असते. मात्र काय लेटेस्ट फॅशन आहे आणि त्यानुसार तुझ्यावर खर्च करावा हे मला शक्य नाही, इतके मात्र लक्षात ठेव. तुझे बाबा हयात असते तर वेगळी गोष्ट होती. आज मी त्यांची जागा घेतलेली आहे हे लक्षात असू दे तु कायम. असं नूतन कधी कधी एका श्वासात आपल्या लेकीला सांगे.
मधुला बारावीत खूप चांगले गुण मिळाले आणि नंतर मेडिकलच्या प्रवेश परीक्षेत देखील. नूतन खूप खुश झाली. तिची मेहनत सफल होत होती. ती सासू-सासर्यांची खूप सेवा करी. रघुच्या निधनानंतर दोघेही तसे खूप खचले होते. आणि मग सासू आजारी पडली आणि कॅन्सरचे निदान झाले.
या सर्व प्रवासात रघुचे जे मालक होते त्यांनी खूप मदत केली. नूतनच्या दृष्टीने तो देव माणूस होता. सासूच्या दवाखान्याचा खर्च सगळा त्यांनी उचलला. सासूने कशी बशी दोन वर्षे काढली. ब्रेस्ट कॅन्सर होता आणि बराही होत आला होता पण त्यात त्यांना कावीळ झाली आणि त्या दगावल्या.
नूतनवर हा अजून एक आघात होता. खूप मायाळू बाई होती तिची सासू! आता सासरे एकटे पडले. तिने त्यांना आपल्या घरी आणून घेतले पण पत्नी विना त्यांना करमेना आणि त्यांनी आपले जेवण खूप कमी करून टाकले. पत्नी गेल्याच्या सहा महिन्याच्या आत ते पण झोपेतच गेले. नूतन अजूनच एकटी पडली. मधु तिच्या अभ्यासात व परीक्षांमध्ये व्यस्त असे. ती एमबीबीएसच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाली आणि तिची internship सुरू झाली.
तिला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी गायनॅक विषय घ्यायचा होता आणि तो तिला सहज मिळाला. गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. मधुने अभ्यासात आपले प्राण पणाला लावले होते हे मात्र निश्चित. रघुचे मालक तिच्यावर स्वतः देखरेख करीत असत. नूतन त्यांची खूप ऋणी होती. तेही आता वयस्कर झाले होते पण त्यांच्या हाती गुण होता आणि ते हॉस्पिटलमध्ये खूप लोकप्रिय होते. त्यांची पत्नी देखील नूतन व माधुरीला सर्वतोपरी मदत करीत असे.
माधुरीचे गायनॅक चालू असतानाच ती एका बरोबरीच्या डॉक्टरांच्या प्रेमात पडली. मुलगा चांगला होता. सधन घराण्यातील होता. नूतनला ही गोष्ट मधूने मोकळेपणाने सांगून टाकली.
बेटा ! त्याच्या घरच्यांना हे सगळे पटेल का? आपले घर कसे ? परिस्थिती कशी हे त्यांना ठाऊक आहे का? आणि नसले तर माहीत झाल्यावर खपेल का? नूतननेे लेकीला विचारले.
आई! त्याला सर्व कल्पना आहे आणि त्याने आपल्या घरच्यांना देखील ही कल्पना दिली आहे. त्यांना मी भेटले देखील आहे. आता तुम्ही सगळे आपापसात ठरवा. मी तसे प्रणयला सांगेन. मधु आईला म्हणाली.
नूतनला हे सर्व ऐकून बरे वाटले. तिने प्रणयला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिला स्वतःला सगळे एकदा पडताळून घ्यायचे होते.भावी व्याह्यांना भेटायच्या आधी.
प्रणय भेटायला आला. त्याने नूतनला अगदी वाकून नमस्कार केला. मधुच्या गरीबीचे किंवा तिच्या लहान घराचे त्याला काहीच वावगे वाटले नाही. नूतनला फार बरे वाटले.
प्रणयच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना भेटायची इच्छा तिने व्यक्त केली. प्रणयने ते सगळे घडवून आणले.
प्रणयच्या घरच्यांंना लग्नाबाबत काहीच अडचण नव्हती. त्यांना माधुरी खूप आवडली होती आणि नूतनबद्दल त्यांना खूप आदर पण होता.
लग्नाची तारीख ठरली. नूतनवर लग्नाचे काहीच ओझे पडू नये अशी प्रणयची मनापासून इच्छा होती आणि तसेच घडले. त्याच्या घरच्यांनी सगळा खर्च पेलून घेतला. मधुच्या मैत्रिणींनी तिला खूप सुंदर भेटी दिल्या. नूतनने आपल्या परीने मंगळसूत्र, कानातले व दोन बांगड्या करून दिल्या. नूतनच्या मैत्रिणींनी देखील मिळून माधुरीला सोन्याची चेन दिली. एकूण सर्व व्यवस्थित पार पडले.
माधुरी सासरी निघून गेली. डिग्री मिळालीच होती. internship सुरू असतानाच दोघांना नोकर्यांची ऑफर आली. काही दिवस नोकरी करून मग स्वतःची प्रॅक्टिस सुरू करावी असा प्रणयचा विचार होता.
याच काळात त्याच्या अमेरिकेत राहणार्या एका मित्राने त्याला अमेरिकेत येण्याचा आग्रह केला. भारतीय डॉक्टरांना तिथे खूप स्कोप आहे असे त्याचे म्हणणे होते. माधुरीला ते एकदम पटले. तसे पण तिला अमेरिकेचे विशेष आकर्षण होते.
नूतन हताश झाली. तिला वाटत होते की आपली लेक आपल्या म्हातारपणी आपल्या जवळच असावी. निदान आपल्या देशात असावी.
पण मधुला आईला सोडून जाण्याचे काहीच वाटत नव्हते. तिने लगेच प्लॅनिंग सुरू केले. आपण तिकडे हे नेऊ ते नेऊ. तिथे साड्या तर मुळीच चालणार नाहीत. कधीतरी एखाद्या समारंभात नेसायला ठीक इत्यादी इत्यादी. तिथे जीन्स आणि टॉप्स लागणार.Costume ज्वेलरी वगैरे वगैरे. दोन सोन्याच्या बांगड्या पुष्कळ झाल्या बरोबर न्यायला. मोजकेच खरे दागिने. ती खूपच प्रफुल्लीत झाली.
प्रणयने मित्राची ऑफर स्वीकारली आणि सगळी व्यवस्था झाली. मित्राने सुरुवातीला त्यांच्या राहण्याची सोय स्वतःच्याच घरी केली. त्याचे लग्न झालेले नव्हते. त्यामुळे पत्नीला आवडेल की नाही हा प्रश्न नव्हता.
माधुरी व प्रणयला विमानतळावर सोडायला नूतन आणि प्रणयचे घरचे गेले होते. नूतनच्या डोळ्यातील अश्रू खळत नव्हते आणि माधुरी आईवर चिडत होती.
आई! आम्ही तुला तिथे बोलवू की! आणि आम्ही नेहमीसाठी थोडेच जाणार? पाच वर्षे जास्तीत जास्त! लोक पेढे वाटतात मुलं अमेरिकेला जाणार असल्यावर आणि तू रडत बसलीस! मधु तिला सांगत होती.
यावर मधुची सासू म्हणाली,मध, तू तिच्या दृष्टिकोनातून विचार कर. तू इतक्या दूर चालली आहेस. याचे दुःख तिला होणारच. तू तिचे सर्वस्व होती आणि आहेस. समजून घे तिला. असे म्हणत त्यांनी नूतनला आपल्या कवेत घेतले व तिच्या पाठीवरून हात फिरू लागल्या. माधुरी गप्प बसली.
विमान उडाले… आता आपली लाडकी लेक आपल्याला कधी दिसेल या विचाराने नूतन खूपच व्याकुळ झाली.
दिवसा तिचा वेळ दवाखान्यात जाई मात्र तिला आपल्या लेकीशी अधून मधून होणार्या फोनवरील संभाषणाची आणि तिच्या होणार्या भेटींची खूप आठवण येई. तिच्या मैत्रिणी तिला धीर देत. सांगत,हे बघ! या निमित्ताने तुला अमेरिका बघायला मिळेल! आणि रोज नाही पण नियमित फोन येतच राहतील की! त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय नूतनकडे पर्याय नव्हता.
मधूने तिला एकदाही अमेरिकेत ये असे म्हटले नाही! मग समजले की ती गरोदर आहे. एव्हाना तिला जाऊन चार वर्षे लोटली होती. नूतन खूप आनंदली. तिला वाटले बाळंतपणासाठी तरी आपली लेक आपल्या देशात येईल. तिचे व तिच्या बाळाचे भरपूर कोड कौतुक करता येईल. मनोमन तिने कितीतरी मनोरे बांधले. मात्र मधुने भारतात न येण्याचा निर्णय घेतला. बाळाचा जन्म अमेरिकेत झाला तर त्याला सहाजिकच त्या देशाचे नागरिकत्व मिळेल हे कारण पुढे आले. बाळंतपणासाठी मात्र मधुने आपल्या आईला बोलावले. नूतन गेली.
सगळेच वेगळे होते इथे. खाणे पिणे इत्यादी सगळं! मधुचे बाळंतपण सुरळीत झाले. नूतन तिथे चार महिने राहिली आणि परतली.
बाळाला तिची व तिला बाळाची खूप सवय झाली होती. बाळाचे नाव अमित ठेवले होते. बाळही आपल्या आजी शिवाय रडे कारण त्याला नूतन परतल्यानंतर मधु पाळणा घरात पाठवायला लागली होती.
नूतन देखील भारतात आल्यावर बरेच दिवस खूप उदास राहिली. तिचे रिटायरमेंट देखील आता जवळ येत चालले होते. मधूने आपल्या बाळाला घेऊन या देशात एकदा तरी लवकरच यावे अशी तिची खूप इच्छा होती आणि या दृष्टीने तिने तयारी देखील सुरू केली होती. आपल्या घरी येऊन राहिली तर बाळाला व तिला नीट बाथरूम हवे! रघुचे स्वप्न होते चांगल्या फ्लॅटचे. तिने रघुच्या जुन्या मालकांकडून कर्ज घेऊन एक attached बाथरूम असलेली बेडरूम, छोटा हॉल व किचनचा एक फ्लॅट बुक केला व हप्ते फेडू लागली. वर्षभरात काही हप्ते फेडून झाल्यावर तिने त्या घराचा ताबा घेतला. ही गोष्ट तिने लेकीला कळवली नाही. आपल्या व्याह्यांना देखील सांगितले होते की, त्यांनी तिला कळवू नये. एव्हाना अमित पाच वर्षांचा झाला होता. फोनवर कधीतरी बोलणं होई तेव्हा तिच्याशी इंग्रजीतूनच बोले आणि तिला आजी ऐवजी ग्रॅनी म्हणायला लागला होता.
नूतन या सर्वांना भेटायला खूप उत्सुक होती. तिने बाथरूम मध्ये व्यवस्थित टब लावून घेतला होता. शॉवरची व्यवस्था केली होती. त्यांना बेडरूम देऊन ती हॉलमध्येच झोपणार होती. स्वयंपाक काय करायचा? बाळाला जास्त तिखट खाण्याची सवय नव्हती. प्रणयला सासूच्या हातचे जेवण खूप आवडे!
त्यांचे भारतातील एकूण 18 दिवस दोन घरी विभागून जाणार होते. कदाचित मधुच्या सासरी जास्त. त्यातच त्यांचा तीन-चार दिवस गोव्याला जाण्याचा कार्यक्रम ठरला. नूतनचा थोडा विरसच झाला. आपल्या लेक जावई व नातवाला भेटण्यासाठी ती खूप आतुर होती. मुंबईत पोहचल्या पोहचल्या आधी गोवा मग पुन्हा मुंबई असा कार्यक्रम ठरला.
ज्या दिवशी ती लोकं पोहोचणार त्या दिवशी नूतनचा उत्साह उतू जात होता. अमितसाठी तिने राजस्थानी ड्रेस घेतला होता. मधु व प्रणयला काय द्यावे हा प्रश्नच होता पण काहीच नको द्यायला हे तिने मनोमन ठरवून टाकले.
त्यांच्या येण्याचा दिवस उगवला. सकाळपासून तिची लगबग सुरू होती. एव्हाना ती रिटायर झाली होती. तिने दारावर तोरण बांधले… त्यांना ओवाळण्याची तयारी केली आणि केव्हा,आम्ही निघालो आहोत आणि थोड्याच वेळात पोहोचू!अशा फोनची वाट बघत बसली.
त्यांनी पोहोचण्याची जी वेळ दिली होती ती टळून गेली. शेवटी एकदाचा फोन वाजला.
काय हे? कुठे राहिलात? किती वाट बघत आहे मी! ती किंचित वैतागून म्हणाली.
आई ऐक! अगं आम्ही आता सरळ एअरपोर्टवर निघालो आहोत! अमित म्हणतो मला ग्रॅनीकडे राहायचे नाही! मी त्याला म्हणाले होते की तिथे बाथरूममध्ये टब नाही. मग तो म्हणाला, शी! मी तिथे जाणार नाही! आणि शिवाय फोनवर ग्रॅनी सारखी रडते. मला रडकी ग्रॅनी नको! आई खूप नॉटी झालाय हा! बरं ठेवते! विमानतळ आले! आता अमेरिकेला पोहोचल्यावर फोन करेन! मधु फोनवर बोलत होती.
नूतनच्या तोंडून शब्दच बाहेर फुटले नाहीत! घर तिला वाकुल्या दाखवीत होते! तोरण कुणाची तरी वाट बघत होते! ते कोणीतरी येणारच नव्हते! ओवाळायची थाळी उदासवाणी जवळच पडून होती! तिच्या हातून रिसीव्हर खाली पडले आणि ती तिथेच आडवी झाली! डोळ्यातून अश्रू देखील ओघळत नव्हते! ओघळत होती ती विरस झालेली स्वप्ने!
समाप्त.