Saturday, May 18, 2024
Homeब्लॉगBlog : महिलांनो स्वतः साठी एवढं नक्कीच करा...

Blog : महिलांनो स्वतः साठी एवढं नक्कीच करा…

प्रत्येक महिला स्वतःच्या संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलाबाळांची काळजी घेणेसाठी आणि वडील धाऱ्यांची सेवा करणेसाठी सातत्याने खपत असते. महिला गृहिणी असो, नौकरदार असो वा व्यावसायिक असो तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्य पार पाडावेत लागतात. सुशिक्षित असो वा अशिक्षित, गरीब घरातील असो वा श्रीमंत महिलांना त्यांची दैनंदिन कर्तव्य, घरकामे, घरातील रुग्णांची सुश्रुषा चुकत नाही. इतकेच काय पण एकादी महिला फारकत घेऊन माहेरी राहत असेल, अथवा एकटी राहत असेल, वैधव्य आलेली असेल तिला तिच्या उदरनिर्वाहासाठी झटणे क्रमप्राप्त असते…..

मुलबाळ असल्यावर तर ही जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पाडणे जास्त जिकिरीचे असते. एकटी महिला जेंव्हा मुलांचे संगोपन पती पासून लांब राहून अथवा पतीच्या निधनानंतर करते तेव्हा तिला खूप अडचणींना, मुलांच्या प्रश्नांना, समाजातील टीकेला, सासर माहेरील लोकांच्या टोमण्यांना सामोर जावे लागते. पण या सगळ्यात ती स्वतः कुठे असते? ती तिच्या अपेक्षेनुसार जगत असते का?? समुपदेशन करताना अनेक महिलांशी बोलतांना हेच लक्षात येते की अनेक महिला वर्षानुवर्षे संसारात गुरफटून गेलेल्या आहेत.

- Advertisement -

घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांचे टाइम्स टेबलं सांभाळताना त्यांनी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. स्वतःची तब्बेत, खाणे पिणे, हिंडणे फिरणे, मैत्रिणी ना भेटणे, स्वतःचे छंद कला जोपासणे, पुरेसा आराम करणे, पथ्य पाणी जपणे याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे.

इतरांची मर्जी सांभाळताना त्या स्वतःला विसरून गेलेल्या आहेत. आपल्याही काही आवडी निवडी आहेत, आपलेही विचार अस्तित्व आहे, आपल्याला देखील नवीन काही पाहायची, शिकायची आवड आहे, लोकांमध्ये मिसळायचे आहे, खूप फिरायचे आहे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे यावर त्यांनी विचार करणेसुद्धा सोडून दिलेले आहे. या सर्व गोष्टीशी तडजोड करुन संपूर्ण आयुष्य त्याग करुन देखील त्या सुखी नाहीत, समाधानी नाहीत. त्या तर नाहीच पण कुटुंबात पण त्यांना काही खूप मोठे आदराचे मानसन्मानाचे, कौतुकाचे स्थान नाही. महिलांवर कळत नकळत अनेक बंधन, अनेक जबाबदाऱ्या इच्छा नसताना देखील येऊन पडलेल्या असतात. मनाविरुद्ध त्याचा स्वीकार त्यांनी केलेला असतो. कोणाला दुखवायचं नाही याच मानसिकतेमधून त्या कोणत्याही कामाला, जबाबदारीला नाही म्हणतं नाहीत. त्यांच्याही नकळत त्यांचा सर्व वेळ, श्रम, ताकद, कौशल्य अश्याच गोष्टींमध्ये जात राहाते ज्या करण्यात त्यांना थोडाही रस अथवा आवड नसते. परंतु घरच्यांनी तिला पूर्णपणे गृहीत धरलेले असते आणि त्याच वेळी ते काम झालेले नसल्यास तिला असे काही ऐकवले जाते की ती जणू काही मशीन आहे आणि जसा तिचा जन्मच सगळ्यांच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झालेला आहे.

आपल्या आयुष्यात सातत्याने अश्या प्रकराची तडजोड करावी लागू नये यासाठी महिलांनी त्यांच्या युवा अवस्थेपासूनच काही बाबी निश्चित करणे आवश्यक आहे. लग्ना आधीच स्वतः जास्तीजास्त शिक्षण घेण्याचा, विविध व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा, विविध कला गुण छंद जोपासण्याच्या सातत्याने प्रयत्न करीत राहा. लग्नाच्या आधीच स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवायचा प्रयत्न करा. लग्नानंतर देखील पुढील शिक्षणाची, नौकरीची संधी मिळाल्यास ती सोडू नाका. सर्व एकत्र सांभाळताना थोडी तारांबळ नक्कीच होईल पण स्वतःचे अस्तित्व, ओळख निर्माण होण्यासाठी हे खूप महत्वाचे असेल.

अनेकदा सासर खूप चांगल मिळाल म्हणून, घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं म्हणून, अथवा प्रेम विवाह केला म्हणून महिलांच शिक्षण अर्थवट अपूर्ण राहाते. एकदा संसारात गुंतल्यावर मग त्याबद्दल काही वाटेनासे होते. सर्व गरजा भागत आहेत,सदन कुटुंब मिळाले आहे, मग कश्याला शिक्षण पूर्ण करत बसायचं , नौकरी किंवा व्यवसाय का करावा कशाची कमी नाहीये या विचारसरणी मधून महिला स्वतःला घर एके घर या पिंजऱ्यात बंद करुन घेते. मुलं जो पर्यंत लहान आहेत तोपर्यंत त्यांच्या प्रती सर्व कर्तव्य पार पडताना तिचे दिवस निघून जातात. पण एकदा मुलं मोठी झाली, संसारातील नवीन नवलाई संपली की आपण कोण आहोत, आपली ओळख काय, बाहेरील जगात काय सुरु आहे, आपल्या बरोबरीच्या मैत्रिणी कुठे आहेत काय करीत आहेत, आपल्याला समाजात कोण कोण ओळखत, काय म्हणून ओळखत हे प्रश्न मनाला सतावू लागतात.

आपल्यात पहिल्यासारखा आत्मविश्वास, धडाडी, निर्णय क्षमता, साहस, उमेद शिल्लक राहिली आहे का यावर महिला विचार करु लागते आणि या प्रश्नांची जेव्हा नकारात्मक उत्तरे तिला मिळतात तेव्हा तिचे मनोबल अजून कमी होते. घरातल्याशी मला काहीतरी करावंसं वाटतंय ! या विषयावर बोलायला गेलं तर अनेकदा पाहिले तिच्याकडे दुर्लक्ष केल जात. जास्तीतजास्त उत्तर मिळत की काही कमी पडतंय का तुला, सगळं तर आहे तूझ्या मनासारखं, यावयात काय करणार आहेस आता, कोण तुला उभ करेल बाहेरच्या जगात, घराकडे दुर्लक्ष वहायला नकोय, मुलांना पूर्ण वेळ तुला देण आवश्यक आहे हे वाढीचे नाजूक वय असत मुलांचं, घरातील जेष्ठ व्यक्तींच कोण पाहणार, आला गेला, पै पाहुणा कोण बघणार, सण वार व्यवस्थित होणे महत्वाचे आहे. आजवर तर सगळं तूच केलंस, तुला ते सगळं व्यवस्थित जमत या कामासाठी तुझी घरात जास्त गरज आहे, त्यामुळे नको खूळ डोक्यातून काढून टाक.

मुळात लग्नाच्या आधीच काही गोष्टी विशेषतः करियर बाबतीतले आपले विचार आणि निर्णय ठाम पणे व्यक्त करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लग्नानंतर मुलींना नौकरी सोडायला सांगितले जाते. भविष्यात नौकरी करण्याबाबत विचारल्यास लग्नानंतर बघू , करु, मुलं मोठी झाल्यावर करु, असं म्हणता म्हणता स्त्री आयुष्यभर या रहाटगाडग्यातून बाहेर पडू शकत नाही.

कालांतराने स्वतःच शिक्षण, नौकरी, उद्योग, व्यवसाय इतकंच नाही तर महिला स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत, राहणीमान, सौंदर्य, व्यक्तिमत्व, आवडीनिवडी याबद्दल देखील अतिशय निरुत्साही झालेल्या दिसतात. आहे त्या परिस्थिती मध्ये समाधान मानून घेणे, आता आपण कधी काहीच करु शकणार नाही अशी भावना मनात निर्माण होणे आणि त्यातून स्वतःला कोसत राहणे, कुढत राहणे,अथवा इतरांना, परिस्थिती ला, नशिबाला दोष देत राहणे अशी वर्तवणूक महिलांमध्ये उदयाला येते.

खरंतर आपण रोज नव्याने आयुष्य सुरु करु शकतो, कोणत्याही क्षणी नवीन कार्याची, कामाची, दिनचर्येची सुरुवात करु शकतो फक्त त्यासाठी प्रचंड इच्छा शक्ती आणि सकारात्मक विचारशैली आवश्यक आहे. समुपदेशन मार्फत आपण अनेक महिलांना अश्या प्रकारे संसार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या सांभाळून देखील स्वतःला आत्मिक समाधान, आनंद मिळण्यासाठी आवडीचे उपक्रम, उद्योग, छोटे व्यवसाय, सामाजिक कार्य, छंद, समाजात मानसन्मानाचे स्थान, स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याचे विविध उपाय यावर चर्चा करुन त्यांना कोणत्याही वयात स्त्री भरारी घेऊ शकते याबद्दल मार्गदर्शन करीत असतो.

घरच्यांना विश्वासात घेऊन, त्यांचं सहकार्य मिळवून, कोणतेही नातेसंबंध न दुखावता, न दुरावता देखील आपण आपल्या निरोगी जीवनशैली साठी, आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी, आपल्यातील आत्मसन्मान, स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्याने कश्या प्रकारे ऍक्टिव्ह राहावे, स्वतःला आनंदी, फ्रेश आणि हसतमुख व्यक्तिमत्व कसे बनवावे यावर चर्चा करीत असतो. आयुष्य कोणत्याही वळणावर बदलू शकते, तुम्ही ध्यास घेतला, दृढ निश्चय केला तर अशक्य काहीच नसते हे महिलांना पटवून देणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच स्वतःला अनेक कुचकामी कारण आणि सबबी देऊन अडकवून घेतलेले लक्षात येते. त्याच त्याच रुटीन मधून, रोजच्या त्याच बहाण्यांमधून बाहेर पडणे ठरवलं तर अतिशय सोपं आहे, फक्त कोणीतरी योग्य दिशा दाखवणे आवश्यक असते. इतर महिलांनी देखील अश्या प्रकारे काहीतरी करु पाहणाऱ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महिलांना आपल्यात सामावून घेणे, त्यांना आत्मविश्वास देणे, त्यांना संधी देणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्री ला स्वतःची ओळख होणे, आपली क्षमता जाणून घेणे, स्वतःला बाहेरील जगाशी संपर्कात राहण्याचा मूलभूत अधिकार नक्कीच आहे. त्यामुळे घरातल्या लोकांनी देखील तिला फक्त कामवाली म्हणून गृहीत न धरता, तिचा विविध अंगानी विकास कसा होईल, तीच मनोधर्य आबादित कसे राहील, तिला तिच्या आयुष्यात समाधान कशात मिळेल यावर विचार विनिमय करणे आवश्यक आहे.

स्त्री शिकली प्रगती झाली इतकंच म्हणून उपयोग नाही तर स्त्रीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ देखील घेता आला पाहिजे. युवतींना, महिलांना फक्त त्यांच्या समाधानासाठी थोडंफार शिक्षण देणे इतकंच अपेक्षित नसून त्यासोबतच त्यांना स्वतःसाठी जगण्याचे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, थांबू नये, हार मानू नये, यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत राहणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

समुपदेशन दरम्यान अनेक महिला स्वतःला एकाकी, एकट्या समजत आहेत हे लक्षात येते. सुखी संसार, अनुरूप जोडीदार, सर्व भौतिक सुख असून देखील मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक सल त्यांना जाणवत असते. अनेकांचा असा गैरसमज असतो की एकदा ठराविक वय ओलांडलं की माणूस विशेषतः महिला करियर वगैरे काही करु शकत नाही.

परंतु करियर म्हणजे असलेल्या शिक्षणाच्या अनुषंगाने च एखादी नौकरी अथवा व्यवसाय वर्षानुवर्षे करणे आणि भरभक्कम पगार मिळवणे असा अर्थ होत नाही.

आपल्यात अनेक सुप्त कला, गुण छंद, सामर्थ्य असते. याला व्यवस्थित आकार दिला, त्यात थोडाफार सराव केला तरी आपण त्या विषयात प्रगती करु शकतो. करिअर हे फक्त उत्पन्न मिळवण्यासाठी च नसून आपल्याला आपल्या आयुष्याला ओळख मिळण्यासाठी केलेला कोणताही उपक्रम, अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी ज्यातून आपण आनंद प्राप्त करु शकू, असे कोणतेही योगदान ज्यातून आपली एक प्रतिमा तयार होईल. हे सर्व करण्यासाठी निश्चितच वयाचे बंधन नसते. लोकांनी आपल्यावर बंधन घालण्यापेक्षा आपणच आपल्याला एका साच्यात अडकवून ठेवलेले असते. आम्हाला चालत नाही, आमच्यात हे आवडत नाही, आमच्या घरी याला परवानगी नाही, आम्हाला हे जमूच शकत नाही, असा काहीच अनुभव आम्हाला नाही, संधीच मिळत नाही, स्पर्धा खूप आहे अशी नानाविध कारण आपणच आपल्याला सांगत असतो. जगात कोणीच तुम्हाला हात धरून पुढे आणणार नाही, कोणीही स्वतःहून तुम्हाला मोठेपणा देणार नाही, घरातून सुद्धा प्रत्येक स्त्रीला दाबण्याचाच प्रयत्न होतो. खूप कमी ठिकाणी महिलांना स्वतःसाठी वेळ आणि वाव देता येतो. हे करण्याची उर्मी स्वतःच्या अंतर्मनातून आली तरच ते शक्य आहे.

त्यामुळे कुशल गृहिणी, आदर्श माता आणि सर्वगुणसंपन्न पत्नी होण्याबरोबरच स्वतःसाठी सुद्धा जगणं आवश्यक आहे. यासाठी प्रथम प्रत्येक महिलेने स्वतःचा दैनंदिन दिनक्रम, दररोजची दिवसभरातील घरातील, बाहेरील कामे, आठवड्यात पूर्ण करण्याची, महिन्याभरात पूर्ण करण्याची कामे याची सविस्तर यादी करावी. त्यातून घरातील घराबाहेरील कामांचे वर्गीकरण करावे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले वैयक्तिक टाइम टेबलं तयार करावे.

कामाचा प्राधान्य क्रम ठरवावा, प्रत्येक कामाला लागणार वेळ निश्चित करावा. त्यातून आपल्यालाच लक्षात येईल की, आपण किती तास कुठे घालवतोय, आपला वेळ नेमका कुठे जातोय, वाया जाणारा व्यर्थ जाणारा वेळ किती आहे आणि कश्यामुळे आहे. सुरवातीला एक महिना असा प्रयोग करून पाहिल्यावर तुम्हालाच तुमच्या हाती स्वतःसाठी हक्काचा किती वेळ दररोज शिल्लक असतो ते समजेल आणि त्यावेळचा सदुपयोग कसा करावा याचे नियोजन करता येईल.

अनेक महिला दररोज वर्तमानपत्र वाचत नाहीत, टीव्ही वरील बातम्या देखील बघत नाहीत, अनेक महिलांना ड्रायविंग येत नाही त्यामुळे त्या कुठेही जाण्या येण्यासाठी घरातील कोणावर तरी अवलंबून राहतात, त्यातून त्यांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा येतात त्यामुळे बाह्य जगाशी त्यांचा संपर्क राहत नाही. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. रोजच्या कंटाळवाण्या जीवनशैली मधून बाहेर पाडण्यासाठी आपल्या मैत्रिणींना भेटा, शेजार्यांकडे जा त्यांच्यासाठी वेळ काढा, नावाजलेली पुस्तकं वाचा, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात कार्यक्रमात सहभागी व्हा, प्रदर्शन, उत्तम नाटकें, उत्कृष्ट चित्रपट आवर्जून बघा. विविध कलाकारांचे कार्यक्रम, सर्व प्रकारचे सोहळे याला उपस्थित राहायचा प्रयत्न करा, सकारात्मक, उत्साही लोकांमध्ये मिसळा. आपला परिसर, आपले शहर माहिती करुन घ्या. जोपर्यंत आपण पुढे पाऊल टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही ओळखणार नाही. हे सर्व करायला सूरूवात केल्यावरच आपल्या लक्षात येईल आपल्या कमतरता काय आहेत आपली कौशल्य काय आहेत त्यातून स्वतःची जडणघडण साधने शक्य होईल, मोकळा श्वास घेणे शक्य होईल.

घरातल्या लोकांना तुम्हाला गबाळ, अव्यवस्तिथ, अजागळ बघायची सवय होऊन जाते आणि मग तुम्हालाही त्यात काही वावगे वाटतं नाही. घरातच तर असतो मग काय नट्टा पट्टा करुन राहायचा तर तसें नाही पण चोवीस तास घरासाठी झिजण्यासोबतच, स्वतःचे कपडे, स्वतःची स्वछता, राहणीमान, भाषाशैली, देहबोली, तब्बेत, स्वतःचे रुटीन मेडिकल चेकिंग, आहार विहार, मानसिक आरोग्य याकडे आवर्जून लक्ष द्या. आपण स्वतःच स्वतःला बदलू शकतो, आपणच आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो.

महिलांनो शारीरिक आरोग्य बिघडलं तर निदान आपल्याला त्याची लक्षण ताबडतोब जाणवतात, इतरांना देखील ते आजारपण समजते, आपल्यावर औषधं उपचार केलें जातात, डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. परंतु आपले मानसिक आरोग्य बिघडले आहे का? हे आपल्याला देखील लवकर समजत नाही तर ते इतरांना कसे लक्षात येणार????

प्रथम आपले मानसिक आरोग्य कोणकोणत्या घटना घडामोडी, अथवा कोणत्या कारणाने बिघडत आहे हे जाणून घ्या. मानसिक आरोग्य बिघडलेले असण्याची काही ठळक पण पटकन लक्षात येणारी लक्षणें प्रथम समजून घ्या, जेणेकरून त्यातून वेळीच सावरणे , बाहेर पडणे तुम्हाला शक्य होईल.

आपल्याला सतत रडायला येते आहे, असुरक्षित वाटते आहे, कोणीच आपलं नाही, कोणीही आपल्याला समजून घेत नाही असे वाटते आहे, आत्महत्येचे विचार मनात येत आहेत, आपली जास्त चिडचिड होते, आपण कायम नाराज उदास असतो, आपण सतत स्वतःला इतर स्त्रियांच्या तुलनेत कमी लेखत असतो, आपल्याला छोटया छोटया गोष्टीतून ताण – तणाव येतोय, आपण सतत भूतकाळाचा अथवा भविष्याचा विचार करतोय, आपल्या मनात सतत कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत असल्याची भावना निर्माण होते आहे, आपण चुकीच्या, नकारात्मक, न आवडणाऱ्या घटना घडामोडी अथवा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर असमर्थ ठरत आहोत, आपल्याकडे दुर्लक्ष केलें जाते, आपल्याला डावलले जाते हि भावना आपल्या मनात जागृत झाली आहे, प्रत्येकाने आपल्यावर अन्यायच केला, माझं नुकसान केल अशी वैचारिकता आपल्या मध्ये निर्माण झाली आहे तर कुठेतरी आपलं मानसिक आरोग्य डळमळीत होते आहे. याची वेळीच नोंद घ्या.

वास्तविक आपल्या मनाला विचारांना सदैव सकारात्मक आणि ताजेतवाने ठेवणे फक्त आपल्याच हातात आहे. पण महिलांच्या बाबतीत त्यांची मानसिकता बिघडण्यास बाह्य घटक, आजुबाजुची परिस्थिती, इतरांच्या आयुष्याशी त्यांनी स्वतःची केलेली तुलना जास्त कारणीभूत ठरते असे समुपदेशन दरम्यान जाणवते.

मुळातच स्वभावाने हळव्या, भावनिक असणाऱ्या महिला कोणतीही गोष्ट विनाकारण मनाला लावून घेणे, मनात ती साठवून ठेवणे, त्यावर सतत विचार करत बसणे, मान अपमानाच्या भ्रामक कल्पना मनात ठेवणे, आपली कोणाला गरज नाही, आपण कोणासाठी महत्वाचे नाही, आपल्याला कायम डावलण्यात येते, आपण दुर्लक्षित आहोत, आपलं घरात तसेच समाजात काहीच योगदान नाही त्यामुळे आपली कोणीच किंमत करत नाही, आपल्यावाचून कुठे काही अडत नाही, आपल्याला महत्व दिले जात नाही यासारख्या अनेक कारणामुळे महिला स्वतःहून स्वतःला दुःखी करुन घेत असतात.

घरातून मिळणारी अपमानाची अथवा दुय्यम दर्जाची वागणूक, जवळचे विश्वासू मित्र मैत्रिणी अथवा नातेवाईक यांच्याशी फारसे घनिष्ठ संबंध नसणे, स्वतःचे विचार प्रभावी आणि स्पष्ट पणे मांडण्याचे सामर्थ्य नसणे, हातात करण्यासारखे काही खास काम नसणे, वेळेचा सदुपयोग न करता, कुठेही एकाग्रता न होता मनात सातत्याने विचारांची मालिका सुरु ठेवणे यातून महिलांचे मानसिक आरोग्य मनःशांती विस्कळीत होताना दिसते.

महिलांनी स्वतः हे कुठेतरी थांबवणं गरजेचे आहे. सोडून द्यायला शिकणे, मनावर न घेणे, स्वतःचे ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करत राहणे या सवयी अंगीकारणे महत्वाचे आहे. या सर्व मानसिक समस्या महिलांच्या आयुष्यात निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना हेच माहिती नसते आपल्याला नेमक काय करायचं आहे, काय हवं आहे? आपल्या जगण्याचं ध्येय काय आहे? वर्षानुवर्षे दिशाहीन, ध्येयहीन जीवन जगण्यापेक्षा आणि नंतर स्वतःला कोसत बसण्यापेक्षा आतापासून कामाला लागा, स्वतःला रिचार्ज करा, रिफ्रेश करा आणि निखळ, निकोप मानसिकता अंगीकारून पुनःश्च नव्याने सुरुवात करा.

इतरांच्या चुकांचा आणि वागणुकीचा अवडंबर करण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय, आपलं काय चुकतंय, आपल्यात काय कमतरता आहेत, आपण त्रस्त तसेच आनंदी होण्यामागची कारणे, व्यक्ती, घटना आपल्या आयुष्यावर चांगला वाईट प्रभाव टाकणारे घटक याचा शोध घ्या. आपले आताचे व्यक्तिमत्व, आताची जीवनशैली, राहणीमान, दैनंदिन कार्य यात कुठे बदल शक्य आहे,

त्यासाठी आपल्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे सर्व करताना संभाव्य अडचणी कोणत्या येऊ शकतात त्यावर आपल्याकडे काय उपाययोजना आहेत याचा सखोल अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला नव्याने स्वतःला उभे करणे सोपे होईल.

अनेकदा अनेक महिलांच्या तोंडून आपण मी घरीच असते हे वाक्य ऐकतो. पण दर वेळी हे सांगणारी महिला कुठे तरी खेद, वाटल्यासारखं, उदास पणे, अपराधी असल्यासारखं चेहरा उतरलेल्या अथवा अवघडलेल्या अवस्थेत हे सांगते असे जाणवते.

समुपदेशन करतांना देखील गृहिणी असणाऱ्या महिलांशी संवाद साधताना जाणवते की त्या खूप मोठया प्रमाणात अनेक बाबतीत पतीवर अथवा मुलांवर अथवा घरातील इतर सदस्यांवर अवलंबून आहेत. यात फक्त आर्थिक दृष्ट्या पतीवर अवलंबून राहणे हाच भाग नसून, कुठेही जाण्यायेण्यासाठी, बिल भरण्यासाठी, स्वतःचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, बँकेतील अथवा बाहेरील कोणत्याही कामांसाठी, डॉक्टर ची अपॉइंटमेंट घेणेसाठी, डॉक्टर कडे जाण्यासाठी, ATM वापरण्यासाठी, खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांना कोणाच्यातरी मदतीची गरज पडते आहे. कोणत्याही कार्यालयीन, वैयक्तिक कामासाठी एखादा अर्ज लिहायचा असेल तरी अनेक सुशिक्षित महिलांना सुद्धा ते जमत नाहीये, आपल्याच शहरात कुठे एकटें जाण्याची वेळ आलीच तरी त्यांना, कोणतेही रस्ते, पत्ते, विविध कार्यालये माहिती नाहीत, तिथपर्यंत कस, कोणत्या सार्वजनिक वाहनाच्या साहाय्याने पोहचता येते याची त्यांना कल्पना नाही.

अनेक महिला अश्या आहेत ज्या सुशिक्षित असून सुद्धा त्यांनी लग्न झाल्यापासून एकट्याने घराबाहेर पाऊल पण ठेवलेले नाही, शेजारी पाजारी जाण्यायेण्याचीही त्यांना परवानगी नाही अथवा त्यांनीही कधी तसा प्रयत्न केलेला नाही. अनेक महिला अभिमानाने सांगतात की भाजी, किराणा, दुध, दैनंदिन वापरातील सर्व गोष्टी मला घरीच आणून दिल्या जातात. कुठेच जावं लागत नाही मला सगळं आयत येत घरात. पण यातून तुम्ही स्वतःला किती कमकुवत, अधू करुन घेता हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.

अश्या प्रकारे जीवनशैली असणाऱ्या महिला जेव्हा कोणताही कौटुंबिक प्रश्न अथवा अडचण घेऊन समुपदेशन ला येतात तेव्हा त्या आजपर्यंत कोणताच बाहेरील जगाचा अनुभव नसल्याने खूपच घाबरलेल्या, गोंधळलेल्या असतात. स्वतःच्या पतीबद्दल, त्याच्या बँक अकाउंट बद्दल, पॉलिसी बद्दल, त्याच्या उत्पनाबद्दल, पगाराबद्दल, त्याने केलेल्या कर्जं प्रकरणांबत, देण्या घेण्याच्या व्यवहारांबाबत पत्नी पूर्ण अंधारात असते. पती कुठे, किती, कोणावर काय खर्च करतो याबद्दल, त्याच्या स्थावर मालमत्ते बद्दल, गुंतवणुकींबद्दल, घरातील इतर आर्थिक व्यवहारांबद्दल, पतीच्या मित्र, मैत्रिणी बाबतीत, पतीचा मोबाईल त्यातील संपर्क याबद्दल देखील त्या पूर्ण पणे अनभिज्ञ असल्याचे जाणवते. आम्हाला कधी त्यांनी अथवा घरच्यांनी याबद्दल सांगितलंच नाही, अथवा आम्हाला कधी जाणून घ्यावंसं वाटलं नाही, अशी वेळ येईल असं कुठे माहिती होत, तशी गरजच कधी पडली नाही. अशी सर्व साधारण उत्तर या महिलांकडून मिळतात.

बहुतांश महिलांच्या बाबतीत तर त्यांनी लग्नानंतर विवाह नोंदणी केली नसल्याचे समजते अथवा ती कुठे कशी करतात याबद्दल त्यांना कल्पना नसते. अनेक महिलांकडे स्वतःचे काही महत्वाचे कागदपत्रे जसे की विवाह नोंदणी चे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन, रेशन कार्ड, पासबुक, चेकबुक हे सुद्धा अपडेटेड नसते. अश्या कागदपत्रांच्या बाबतीत स्वतःच्या ऍड्रेस आयडेंटिटी प्रूफ च्या बाबतीत सुशिक्षित महिला देखील खूप निष्काळजी असल्याचे जाणवते.

प्रापंचिक वैवाहिक जीवनात कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यावर, अथवा पतीचे निधन झाल्यावर अश्या प्रकारे कोणताही व्यावहारिक, बाह्य जगातील अनुभव गाठीशी नसणाऱ्या महिलांची खूपच तारांबळ होताना दिसते. गृहिणी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून त्या भूमिकेत अनेक महिला अतिशय उत्कृष्ट असतात, घरातील सर्व कामात त्या चोख असतात. कुटुंबातील घरातील सर्व कामांची जबाबदारी त्या अतिशय व्यवस्थित पार पाडत असतात. स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावून त्या घर, संसार सांभाळत असतात. पण ज्यावेळी घराबाहेरील कोणतीही जबाबदारी, काम अथवा आव्हानात्मक प्रसंग समोर येऊन उभा राहतो त्यावेळेस मात्र त्या हतबल होऊन जातात.

समुपदेशन दरम्यान अश्या अवस्थेत असलेल्या महिलांना अतिशय बेसिक गोष्टी समजावून सांगण्यापासून सुरुवात करावी लागते. परंतु अश्या पद्धतीने अतिशय मर्यादित स्वरूपाचे आयुष्य जगत असणाऱ्या महिलांना या लेखामार्फत एक संदेश द्यावासा वाटतोय. आपल्या घराच्या कोणत्याही मर्यादा न ओलांडता, सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून देखील कृपया स्वतःला घडवत राहा, घरात राहून सुद्धा खूप ज्ञान आत्मसात करता येते, मोबाईल वर अनेक विषयांवर ऑनलाईन माहिती उपलब्ध असते त्याचा लाभ घ्या. घरात असतांना अथवा घरातील कामे करताना सुद्धा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा, फ्रेश ठेवा. आपल्या मुलांशी, पतीशी त्यांच्या कामाबद्दल, नौकरी अथवा व्यवसायाबद्दल अभ्यासातील नवनवीन विषयांवर चर्चा करा. दररोज त्यांच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी जाणून घ्या. तुम्ही देखील बाहेरील जगात घडणाऱ्या घटना जाणून घ्यायला उत्सुक आहात याची घरातल्या सदस्यांना जाणीव करुन द्या.

छोटे छोटे आर्थिक व्यवहार, आर्थिक निर्णय स्वबळावर घेण्यासाठी प्रयत्न करा, स्वतःसाठी बचत करा. स्वतः खरेदीला जाणे, स्वतःच्या आवडीने, निवडीने आवश्यक त्या गोष्टी आणणे यातून आत्मविश्वास निर्माण होणेसाठी मदत होईल. स्वतःच्या कागदपत्रांचे फायलिंग करणे, आपल्याला उपयुक्त असणारे सर्व महत्वाचे कागदपत्रे बनवून घेणे, अपडेट्स करणे, घरातील इतर महत्वाचे फाइल्स, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आपल्या शिक्षणाची प्रमाणपत्रे याबद्दल सतर्क राहा.

सातत्याने घरातील दैनंदिन कामामुळे आम्हाला घराबाहेर पडायला वेळच मिळत नाही हि स्वतःची खोटी समजूत घालणे सोडून द्या. ज्यावेळी आपल्या आयुष्यात काही कसोटीचा प्रसंग येतो त्यावेळी आपल्याला व्यवहार ज्ञान असणे खूप आवश्यक असते. त्यासाठी स्वतःला तयार करा, आपली निरीक्षण क्षमता, अभ्यासू वृत्ती जागृत करा जेणेकरून दुर्देवाने आयुष्याच्या कोणत्याही कठीण प्रसंगाला एकट्याने तोंड द्यायची वेळ आलीच तर आपण खचणार नाही हरणार नाही.

घर सांभाळणे देखील एक खूप मोठी कला आहे. त्यासाठी खूप मेहनत परिश्रम घ्यावे लागतात. घरातील सर्वांच्या मागण्या पूर्ण करणे, मूड सांभाळणे, मुले लहान असल्यास त्यांचा अभ्यास घेणे, जेष्ठ मंडळींची सेवा सुश्रुषा, पथ्य पाणी, सण वार व्रत वैकल्य, उपास तापास पूजा पाठ सांभाळणे, पै पाहुणा, आजारपण असलेल्या नातेवाईकांची सेवा, वेगवेगळ्या ऋतू मधील वेगवेगळे साठवणीचे बेगमीचे पदार्थ बनवणे, घराची स्वच्छता, टापटीप, दररोजचा स्वयंपाक या कामात दमछाक होते हे नक्कीच. तरीही कुठेतरी स्वतःला बाहेरील जगात सुद्धा कुठे अडचण येणार नाही, त्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण लीलया पार पाडू यासाठी सज्ज व्हा.

- Advertisment -

ताज्या बातम्या