Saturday, May 18, 2024
Homeब्लॉगBlog : गणितामागचे तर्कशास्त्र दैनंदिन जीवनातही उपयोगी

Blog : गणितामागचे तर्कशास्त्र दैनंदिन जीवनातही उपयोगी

आज 22 डिसेंबर. महान भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. तो राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. गणितामागे तर्कशास्त्र असते. ते समजावून घेतले की ते दैनंदिन जीवनातही उपयोगात आणता येऊ शकते. त्यादृष्टीने घेतलेला वेध.

रामानुजन यांनी केवळ गणिताला वेगळी ओळख दिली नाही तर बरेच प्रमेय आणि सूत्रेही दिली जी अजूनही फार उपयोगी मानली जातात.

- Advertisement -

जीवन जगण्यासाठी जसे अन्न, वस्त्र व निवारा या गोष्टींची गरज असते तसेच जीवन सुरळीत जगण्यासाठी ‘गणित’ महत्त्वाचे असते. आयुष्यात गणित वजा केल्यावर काहीच उरत नाही. गणिताशिवाय आयुष्य आयुष्यच राहत नाही.

झोपेतून उठले की आपले लक्ष घड्याळाकडे जाते आणि तिथूनच गणित सुरू होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच गणित वापरतात. दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत गणितातील संकल्पना वापरल्या जातात.

दैनंदिन जीवनातील नेहमीच्या कृतींमध्ये अनेक तथ्ये आणि क्रियांमध्ये गणिताची गरज भासते. उदा. वर्तमानपत्रातील माहिती वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी गणिताचे ज्ञान आवश्यक असते. जसे मी शेकडेवारी सूट, कमिशन, लाभांश, बीजक, नफा व तोटा, घाऊक व्यापार इत्यादी.

आपल्या दैनंदिन कार्यांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि इतर यासारख्या गणितीय क्रियांची आवश्यकता असते.

अनेक संस्थांना आणि त्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांना समजून घेण्यासाठी संख्यात्मक दृष्टीची गरज असते. अर्थशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट, इंजिनिअर, वैमानिक यांना मोठ्या प्रमाणात गणिताच्या ज्ञानाची व कौशल्याची गरज असते. अंदाजपत्रके, व्यापार, गणकयंत्रे, संस्थेचे अहवाल, राजकारण, संशोधन इ. क्षेत्रात वाढत्या प्रमाणात गणिताचा उपयोग केला जातो.

गणिताच्या जागतिक स्वरुपात जगात भौतिक रुपात वेगवेगळे विखुरलेले देश एकमेकांना मदत करीत आहेत. गणिताने मनुष्याला निसर्गाची रहस्ये शोधण्यास आणि अंधश्रद्धा आणि अज्ञानावर मात करण्यास मदत केली.

विविध मानसिक क्षमतांच्या विकासासाठी गणिताचा उपयोग होतो. जसे की एखाद्या समस्येचे विश्लेषण करणे, एखाद्या निर्णयाप्रत कसे यावे आणि त्यांचे परिणाम तपासण्यासाठी आणि आपल्या कामाच्या सवयींमध्ये अचूक व व्यवस्थित असणे, संबंध समजून घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी एकाग्र होण्यासाठी हे सर्व गणितामुळे शिकता येते.

तर्क,अनुमान,निरीक्षण, पृथ:क्करण, संश्लेषण, चिकित्सक व नव निर्णायक विचार समस्या निराकरण इ. मानसिक क्षमतांच्या विकासासाठी गणित आवश्यक ठरते.

गणितामुळे आवश्यक गणना अचूक व योग्य गतीने करण्याची क्षमता व कौशल्य प्राप्त होते. मापनाची प्रक्रिया आणि अचूक मापन करण्यासाठी उपकरणांच्या वापरासाठी आवश्यक कौशल्ये या विषयीची गरज विकसित करता येते.

स्वावलंबन व आत्मविश्वासासाठीदेखील गणिताचा उपयोग होतो. जसे की गणिताच्या अभ्यासातून समस्या सोडविण्यासाठी तर्कसंगत पद्धतीने संगतवार काम केले तर यश नक्की मिळते.याची जाणीव अभ्यासकाला होते व तो दैनंदिन जीवनातही ती क्षमता उपयोगात आणतो आणि एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवू शकतो. स्वावलंबी बनतो.

मनाला तर्काधिष्ठित विचारांची सवय लावण्याचा एक मार्ग म्हणजे गणित होय.

प्रसिद्ध गणितज्ज्ञ हॉगवेन यांनी असे म्हटले आहे की, गणित विषयाला संस्कृती तसेच सभ्यतेचा निर्माणकर्ता तसेच पोषणकर्ता मानले जाते.फ तसेच गणितज्ज्ञ लेइब्लित्झ म्हणतात की रस, छंद, अलंकार, संगीत यांचे सर्व साज-सामान, रंगकाम, चित्रकला आणि मूर्तीकला इ. सर्व अप्रत्यक्षपणे गणिताच्या ज्ञानावर अवलंबून असतात. त्याअर्थाने पण संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यात गणिताची मदत होते.

गणिताला सौदर्यात्मक आणि आनंददायी मूल्य आहे. सममिती, क्रम, समानता, प्रारुप आणि आकार इ. संकल्पना कलांच्या सर्व कार्याचा आणि सौंदर्याचा आधार आहेत. प्रश्नमंजुषा, कोडे आणि जादूचे चौरस हे मनोरंजक आणि विचार करण्यासाठी आव्हानात्मक आहेत. अनेकार्थांनी आपल्या जीवनात गणिताचे अध्यापन हे अटळ आहे.

– प्रतीक्षा संदीप निकुंभ

- Advertisment -

ताज्या बातम्या