मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून युती आणि आघाडीची चाचपणी केली जात आहे. यामध्ये आता मुंबई महापालिकेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांनी आघाडी घेतली आहे. आज (रविवारी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकरांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे.
या पत्रकार परिषदेत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2026) २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले. तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील चर्चा सुरु असून, शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar) केवळ ९ जागा सोडण्यासाठी काँग्रेस तयार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबईत किती जागा लढवणार? याबाबत जाहीर केले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काँग्रेसचं नातं घट्ट होतं आहे. भारिप बहुजन महासंघ असं संघटनेचे नाव असताना काँग्रेससोबत आघाडी होती. १९९९ पासून आम्ही सोबत नव्हतो पण २०२५ ला सोबत आहोत. २५ वर्षानंतर ही युती होत असून,दोन नैसर्गिक मित्र आहोत. नैसर्गिक यासाठी कारण संविधान मानणं हा आमचा राजकीय अजेंडा आहे. संविधान सभेची कामकाजात डीबेट नावाचा शब्द वापरला गेला. मतांमध्ये भिन्नता पण हेतू एकच होता. मतभिन्नता असेल तरी मन भिन्नता नाही. करुणा, समता, बंधूंता आहे. संविधानाशी तडजोड करणार नाही. मुंबईत वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे. तर इतर २८ ठिकाणी आमची युतीची चर्चा सुरू आहे. आजपासून आम्ही दोन्ही समविचारी मित्रपक्ष म्हणून राहू, असे त्यांनी म्हटले.




