मुंबई | Mumbai
मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election) महायुतीचा ‘वचननामा’ आज (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीकडून (Mahayuti) जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी आश्वासनांची खैरात बघायला मिळाली. यामध्ये मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे, पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती,धारावीचा विकास हा डीआरपी करणे,२० ते ३५ लाख नवीन घरे बांधणे यासारख्या मोठ्या घोषणा मुंबईकरांसाठी करण्यात आल्या आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, “मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा ‘वचननामा’ जाहीर करत आहोत. मुंबई महापालिका निवडणुक १५ जानेवारीला पार पडत आहे. मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवेल असं वचन आम्ही देत आहोत. १६ जानेवारीला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकणार आहे. मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते आम्ही मांडत आहोत. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमच काम आहे” असे त्यांनी म्हटले.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “काही वर्षात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांना हात घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात असा आत्मविश्वास मुंबईकरांमध्ये तयार केला आहे. त्यामुळे इतर कुणीही वचननामा दिला तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये असलेल्या अंतरामुळे वचननामा पूर्ण करू. पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जाऊ तेव्हा वचननाम्यावर आधारीत ॲक्शन टेकन रिपोर्ट फॅक्टशीट म्हणून मांडू. काय केलं होतं हे सांगू. डीम कनव्हेन्सचे विषय सोडले. जागा फ्रि होल्ड करण्याचं काम केलं. हाईटच्या समस्या सोडवल्या. भविष्यात याला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईत राहणारा मराठी माणूस काहीही झालं तरी मुंबई सोडून जाणार नाही. मुंबईतच त्याला घरं देऊ हा संकल्प घेतला आहे. बीडीडीचाळ पत्राचाळ, विशाल सह्याद्रीत हे करून दाखवलं आहे. आम्ही वचन करणारे आहेत” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महायुतीने आपल्या या वचननाम्यातून मध्यमवर्गीय मराठी माणूस, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि झोपडपट्टीधारक अशा सर्वच स्तरांतील मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः पागडीमुक्त मुंबई (Mumbai) आणि ३५ लाख घरांची निर्मिती यांसारख्या घोषणांमुळे घरांच्या (House) प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांमध्ये आशेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा
खड्डेमुक्त मुंबई : ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे (CC) केले जातील. रस्ते वारंवार खणले जाऊ नयेत म्हणून १७ नागरी सेवांसाठी ‘यूटिलिटी टनेल’ (Utility Tunnel) बनवण्यात येतील.
३५ लाख घरांची निर्मिती : मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा शहरात आणण्यासाठी पुढील ५ वर्षांत ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पागडीमुक्त मुंबई : मुंबईतील जुन्या इमारतींमधील ‘पागडी’ पद्धत बंद करून भाडेकरूंना मालकी हक्काची घरे मिळवून दिली जातील.
२० हजार इमारतींना OC : विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (OC) रखडलेल्या २० हजार इमारतींना तात्काळ OC वितरित केले जाईल.
सफाई कामगार आणि पोलिसांसाठी घरे : सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि पोलिसांच्या जीर्ण घरांच्या पुनर्विकासाला प्राधान्य दिले जाईल.
महिलांना बस प्रवासात सवलत : ‘बेस्ट’ बसच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाईल.
बेस्टचा विस्तार : २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १०,००० इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील.
पाणीपट्टी वाढीला स्थगिती : दरवर्षी होणारी ८ टक्के पाणी दरवाढ पुढील ५ वर्षांसाठी स्थगित केली जाईल.
मोफत आरोग्य तपासणी : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयांत वर्षातून एकदा मोफत फुल बॉडी चेकअपची सुविधा मिळेल.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : प्रत्येक वॉर्डमध्ये ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या आणि औषधे मोफत देणारी केंद्रे पूर्णपणे कार्यक्षम केली जातील.
पूरमुक्त मुंबई : आयआयटी (IIT) सारख्या संस्थांच्या मदतीने जपानी तंत्रज्ञान वापरून मुंबईला ५ वर्षांत पूर्णपणे पूरमुक्त (Flood-free) करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मागेल त्याला शौचालय : झोपडपट्टी भागात स्वच्छता सुधारण्यासाठी ‘मागेल त्याला शौचालय’ हे धोरण राबवले जाईल.
बांगलादेशी व रोहिंग्या मुक्त अभियान : मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बाहेर काढून मुंबई पूर्णपणे घुसखोरमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भ्रष्टाचारमुक्त पालिकेसाठी AI तंत्रज्ञान : महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
कंत्राटदारांचे सक्तीचे पडताळणी : पालिकेच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी मुंबईतील सर्व कंत्राटदारांचे कडक पोलीस व्हेरीफिकेशन आणि कामाची पडताळणी अनिवार्य केली जाणार आहे.
मराठी अस्मिता आणि भाषा विभाग : महानगरपालिकेत स्वतंत्र ‘मराठी भाषा विभाग’ स्थापन केला जाईल. तसेच मराठी तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विशेष ‘नवे धोरण’ राबवून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना जोडून ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ’ उभारण्यात येईल, ज्याद्वारे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्यात येतील.
हुतात्मा स्मारकात जागतिक दर्जाचे संग्रहालय : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हुतात्मा स्मारक चौकात एक जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारले जाईल.




