मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. विशेषतः काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला असून, यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मोठ्या विश्वासाने प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’सोबत (VBA) युती केली होती. मात्र, वंचितला दिलेल्या ६२ जागांपैकी तब्बल १६ जागांवर त्यांना उमेदवारच मिळाले नसल्याने तेथे अर्ज भरले गेले नाहीत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समन्वयाची भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीला मुंबईत ६२ जागा सोडल्या होत्या, तर काँग्रेस स्वतः १५० जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र, मुदत संपल्यानंतर असे लक्षात आले की, वंचितने केवळ ४६ जागांवरच आपले अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित १६ जागांवर उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिलेल्या या जागा आता काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या १६ जागांपैकी अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. युतीधर्म पाळण्यासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी सपकाळ यांनी या जागा वंचितला दिल्या होत्या. परंतु, वंचितने उमेदवार नसल्याबाबत काँग्रेसला वेळीच कल्पना दिली नाही. परिणामी, अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्यामुळे काँग्रेसलाही त्या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार उतरवता आले नाहीत.
या गोंधळामुळे आता काँग्रेसला नामुष्की सहन करावी लागत आहे. ज्या १६ जागांवर अधिकृत उमेदवार नाहीत, तिथे आता काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांनी अपक्ष किंवा बंडखोर म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवार नसल्याने काँग्रेसला आता या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देण्यावाचून पर्याय उरलेला नाही. पक्षाकडून आता या उमेदवारांशी चर्चा करून पुढील रणनीती आखली जात आहे.




