मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा शिवसेना भवनात एकत्र आल्याचे बघायला मिळाले.
ठाकरे बंधूंनी (Thackeray Brothers) प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात पाळणाघरे,पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी,रस्ते,कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा वचननामा शिवसेना (उबाठा) आणि मनसेसाठी महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
हे देखील वाचा : BMC Election Manifesto : ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर; सत्ताधाऱ्यांवर बरसले, नेमकं काय म्हणाले?
वचननाम्यात नेमकं काय?
- घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये स्वाभिमान निधी.
- १० रुपयात जेवण आणि नाश्ता.
- नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांना सांभाळणारी पाळणाघरे.
- पाळीव प्राण्यासाठी दवाखाना.
- बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थ साह्य योजना.
- मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पद भरणार.
- प्रत्येक वार्डात आजी आजोबा मैदान.
- ७०० चौ फाटापर्यंत मालमत्ता कर माफ.
- कचरा कर रद्द.
- महापालिकेच्या शाळा उद्योजकांच्या घशात जाऊ देणार नाही.
- दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यंत ज्युनियर कॉलेज.
- मुंबई पब्लिक स्कुलचा दर्जा अत्याधुनिक करणार.
- मराठी शाळेत बोलतो मराठी हा हसत खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार.
- मुंबई महानगर पालिकेतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठं ग्रंथालय.
- मुंबईचं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय.
- रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ऍम्ब्युलन्स सेवा.
- उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील कंत्राटदाराकडून रस्त्याची १५ वर्षाची हमी घेतली जाईल.
- सांडपाणी प्रक्रिया करणारे मल निसारण प्रकल्प उभारणार.
- पाण्याला दर स्थिर ठेवून मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणार.
- फुटपाथ आणि मोकळ्या जागा.
- खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास.
- महिला आणि विध्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास.
- महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग व्यवस्था.
- प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.
- समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून वापरण्यायोग्य करणार.
- मुंबईतील नालेसफाई १२ महिने प्रक्रिया राबवणार.
- मुंबईतील नागरिकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत.




