मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. राज्यातील सर्वात मोठी पालिका असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र, मतदारयादीत घोळ असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी सकाळी मतदान सुरु होताच ईव्हिएम मशीनमध्ये बिघाड बघायला मिळाला आहे. तर काही ठिकाणी मतदानच उशीराने सुरु झाले आहे. अशातच बोगस मतदान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी आज सकाळपासूनच उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्या काही तासांतच दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये ‘दुबार मतदार’ आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्यासमोरच हा मतदार सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती.
नेमके काय झाले?
वॉर्ड क्रमांक १९२ मधून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. याच वेळी मतदान केंद्रावर एका महिला मतदाराचे नाव दुबार मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित महिला मतदाराला तत्काळ थांबवण्यात आले.
त्यानंतर आधार कार्डच्या आधारे तिची ओळख पटवून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तिच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. त्यानंतरच तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकाराला निवडणूक आयोगाच्या त्रुटी जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




