मुंबई | Mumbai
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूकीचा ‘शिवशक्तीचा वचननामा’प्रसिद्ध केला. यावेळी तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा शिवसेना भवनात एकत्र आल्याचे बघायला मिळाले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, २० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) आले याचा आनंद आहे. ठाणे, कल्याण परिसरात निवडणुका घेण्याआधीच बिनविरोध निवडून येऊन महायुतीने जनतेचा, मतदारांचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. बिनविरोध निवडणुका ज्या ठिकाणी झाल्या आहेत तेथील निवडणुका रद्द केल्या गेल्या पाहिजे. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना निलंबित करून गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी केली.
तर राज ठाकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) बंगालमध्ये बिनविरोध झाल्या होत्या. त्यावेळी भाजप कोर्टात गेला होता. तुम्हाला बंगालमध्ये चालत नाही आणि महाराष्ट्रात चालते. सत्तेचा आमरपट्टा घेऊन कोणी आला नाहीत. आज तुम्ही सत्तेत आला, त्यावेळी काँग्रेसने असं केलं तसं केले तुम्ही सांगता. ज्यावेळी तुम्ही सत्तेतून बाहेर गेल्यावर त्यानंतर येणाऱ्यांनी काही काही बोलले जाईल, त्यावेळी काही बोलू नका. आपण करत असलेली कृती एखादा पायंडा पाडत नाही, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असे त्यांनी म्हटले.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जसं राजकारण केले जाते, तसे महाराष्ट्रात केले जात आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, महाराष्ट्र हा संस्कृत आहे. तुम्ही महाराष्ट्रात युपी बिहारसारखा पायंडा पाडला जात आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आल्यावर काँग्रेसने असं केले म्हणून आम्ही तसे करत आहोत, असे तुम्ही म्हणत आहात. उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका. त्यांना वाटत असेल आपण सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही तर त्यांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. महाराष्ट्राचा, यूपी बिहार करत आहेत. महाराष्ट्राचे अशाप्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. या सर्व गोष्टींचा विचार राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
ही लोकशाही नव्हे तर झुंडशाही
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत म्हटले की, आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडली. आता त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. साम दाम दंड भेद. निगरगट्ट राज्यकर्ते लाभले आहेत. बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाचे नाटके सुरु असून, त्यांनी निकाल राखून ठेवला. पुन्हा निकाल तोच जाहीर करतील. जेनझीचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. केवळ निवडणूक निकाल रोखू नका. तुम्ही तिथल्या निवडणुका रद्द करा. नाही तर तुम्ही गुलाम आहात हे लोकांमध्ये जाईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी आयोगाला लगावला.




