मुंबई | Mumbai
राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून मुंबईत राजकीय समीकरणांची जुळवा जुळव सुरु झाली आहे. महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढत आहेत. तर अजित पवारांना या निवडणुकीत भाजप-शिवसेने सोबत घ्यायचे की नाही याबाबत अद्याप निर्णय बाकी आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत अद्याप संभ्रमाचे चित्र आहे. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आली आहे. शरद पवार गटही ठाकरे बंधूसोबत जायला तयार आहे. मात्र काँग्रेसने मुंबईत एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीची गोची झाल्याचे पहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी बिघाडी
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या संबंधीची घोषणा केली आहे. यावेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
मुंबईत काँग्रेस स्वबळावर
काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
खरे तर, काही दिवस आधी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेसने मुंबई स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस आपला निर्णय बदलेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समोर आले आहे. स्वत: रमेश चेन्नीथला यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
आमची मुंबईत निवडणुकीची सगळी तयारी झाली आहे. मी इथे एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आलो आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत, असेही चेन्नीथला यांनी सांगितले. पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, ‘आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करू. त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की, आम्हाला साथ द्या आम्ही मुंबईचा विकास करू.’
ठाकरे बंधुंची अडचण वाढणार?
काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेस स्वबळावर लढली तर अल्पसंख्याक मतं दुरावण्याची भीती ठाकरेंना आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला काँग्रेसची प्रचंड मदत झाली होती. काँग्रेसची पारंपरिक मतं ठाकरे गटाला मिळाली होती. त्यामुळे ठाकरेंना मुंबईत सहा पैकी तीन जागा जिंकता आल्या होत्या. वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी हातून निसटली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




