मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मुंबईत भाजपला (BJP) ८९, ठाकरेंच्या शिवसेनेला ६५, शिंदेंच्या सेनेला २९, काँग्रेस २४ आणि मनसेला सहा जागांवर विजय मिळाला आहे. तर एमआयएमसह इतर पक्षांच्या मिळून १४ जागा आहेत. त्यामुळे मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
त्यातच शिंदेंच्या सेनेने (Shinde Shivsena) भाजपकडे महापौरपदासाठी (Mayor) अडीच वर्षांसाठी हट्ट धरल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता मुंबई महापौर पदासाठी उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली नाही. ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या वृत्तपत्रातील बातम्या असून, आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही. कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिले आहेत. त्यानुसार भाजप कितीही विजय करत असला तरीही त्यांचा विजय झाला नाही, असेही त्यांनी म्हटले.
शिंदेंना महापौरपदासाठी दिल्लीतून चावी
एकनाथ शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे केडीएमसी आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी होत आहे. एकनाथ शिंदे हे भाजपचे लोहपुरुष असून, त्यांनी शिवसेना फोडली. त्यांना अमित शाह हे दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. आता ते काहीही करु शकतात. जर तसं नसतं तर त्यांनी महापौरपदावर दावा सांगितला असता का? कोणीतरी त्यांना दिल्लीतून चावी देत आहेत, दिल्लीतून एकनाथ शिंदेंना चावी देणारे कोण? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. तसेच मुंबईत भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये, यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला.




