Friday, April 3, 2026
Homeदेश विदेशGold, Silver Rate : ऐतिहासिक दरवाढ! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा,...

Gold, Silver Rate : ऐतिहासिक दरवाढ! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा, सोन्याचे नवे दर किती?

मुंबई । Mumbai

भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतींनी आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी (१९ जानेवारी २०२६), चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने प्रति किलो ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, पिवळा धातू आता दीड लाखाच्या विक्रमी पातळीकडे वाटचाल करत आहे.

- Advertisement -

चांदीच्या किमतीत सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर तब्बल १३,५५३ रुपयांची वाढ झाली. यामुळे १ किलो चांदीचा दर ३,०१,३१५ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. गेल्या शुक्रवारी बाजार बंद होताना हा दर २,८७,७६२ रुपये होता. केवळ १९ दिवसांत चांदीच्या दरात सुमारे ६५,६१४ रुपयांची वाढ झाली आहे, जी गुंतवणूकदारांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा दर २,३५,७०१ रुपये होता, जो आज ३ लाखांच्या पुढे गेला आहे.

चांदीच्या पावलावर पाऊल टाकत सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. सोमवारी बाजार उघडताच सोन्याचा वायदा भाव प्रति १० ग्रॅम (१ तोळा) १,४५,५०० रुपयांवर पोहोचला. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचा दर १,३५,८०४ रुपये होता. अवघ्या १९ दिवसांत सोने प्रति तोळा सुमारे ९,६९६ रुपयांनी महागले आहे.

जळगावच्या सराफ बाजारामध्येही या दरवाढीचे मोठे पडसाद उमटले आहेत. येथे सोन्याच्या दरात प्रति तोळा २,००० रुपयांची, तर चांदीत १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह (GST) विचार केल्यास, जळगावमध्ये सोन्याचे दर १,४८,००० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह ३,०३,८५० रुपये प्रति किलो इतके झाले आहेत.

सोन्या-चांदीच्या या अनपेक्षित दरवाढीमागे जागतिक राजकीय तणाव हे मुख्य कारण मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर नवीन टॅरिफ (शुल्क) लादल्यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या ‘ग्रीनलँड’ ताब्यात घेण्याच्या योजनेला युरोपीय देशांनी विरोध केल्याने हा तणाव वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे आपला मोर्चा वळवला आहे, परिणामी मागणी वाढून किमती गगनाला भिडल्या आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ३ एप्रिल २०२६ – विनाशकाले ‘ट्रम्प’बुद्धी

0
सत्ता आणि अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा लोकशाहीचा प्रवास हुकूमशाहीकडे व्हायला वेळ लागत नाही. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मानवजातीने...