Sunday, November 24, 2024
Homeनाशिकबेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

गळफास घेत आत्महत्या; शहरात खळबळ

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून मालेगावी तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी आलेला व परीक्षा दिल्यानंतर गत तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह छावणी पोलीस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर विद्यार्थ्याने स्वत:च्या शर्टने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (26) हा विद्यार्थी कॅम्प भागातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात 19 जून रोजी टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता. दुपारी अकरा ते साडेबारा या वेळेत त्याने टायपिंगची परीक्षा दिली. परीक्षा चांगली झाल्याचे त्याने कुटुंंबियांना सांगितले. यानंतर रात्री उशिरापर्यंत कुलदीप घरी न परतल्याने त्याला कुटुबियांतर्फे सातत्याने फोन केले गेले. मात्र त्याचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याने संपर्क होत नव्हता.

दुसर्‍या दिवशी कुटुंबीय व नातेवाईकांनी त्याचा मालेगावी व इतरत्र सर्वत्र शोध घेतला. मात्र कुलदीप मिळाला नाही व त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ होता. यामुळे कुटुबीयांतर्फे कॅम्प पोलीस ठाण्यात कुलदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांसह कुटुंंबियांतर्फे त्याचा शोध घेतला जात असतांना आज सकाळी छावणी पोलीस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या एका दुकानाच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांसह नागरिकांनी सदर खोलीत प्रवेश केला असता खोलीतील पाईपाला शर्टाने गळफास घेतलेला तरूण दिसून आला. त्याचा मृतदेह कुजलेला होता. याची माहिती बेपत्ता कुलदीपच्या नातेवाईकांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाहिला असता तो कुलदीपचाच असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सामान्य रूग्णालयात हलविला.

टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आलेला कुलदीप परीक्षेनंतर ती चांगली गेल्याचा निरोप देतो नंतर मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतो व तीन दिवसानंतर त्याचा गळफास घेतलेला मृतदेहच आढळून येतो यामुळे कुटुबियांसह नातेवाईक हादरले आहेत. कुलदीपने आत्महत्या कां केली? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या