Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयRaj Thackeray : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या ‘बॉम्बे’ विधानावर राज ठाकरे...

Raj Thackeray : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या ‘बॉम्बे’ विधानावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

मुंबई । Mumbai

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे, पण सगळ्यांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीवर खिळल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मराठी-अमराठी भाषिक नागरिकांमध्ये मोठा वाद उफाळून आला असताना, आता केंद्रीय मंत्र्यांच्या एका विधानामुळे या वादाला आणखी धार मिळाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले. क्वाण्टम-तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा समावेश यांसारख्या विषयांवर ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयआयटी मुंबईचा उल्लेख करताना म्हटले की, “आयआयटीच्या नावामध्ये तुम्ही बॉम्बे हे नाव कायम ठेवले आणि त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याचा मला खूप आनंद आहे. आयआयटी मद्रासबाबतही माझ्या अशाच भावना आहेत.” जितेंद्र सिंह यांच्या या विधानामुळे नवा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

YouTube video player

केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईकरांना “आता तरी डोळे उघडा” असे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांच्या विधानावर टीका करताना म्हटले आहे की, “जितेंद्र सिंह यांचे हे विधान सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.” यासोबतच त्यांनी एक गंभीर आरोप देखील केला.

राज ठाकरे काय म्हणाले?

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.

आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !

खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.

या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.

आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !

आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !

राज ठाकरे ।

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...