Saturday, October 5, 2024
Homeनगरबोटा स्वस्त धान्य दुकानातील 7 हजार 855 किलो धान्य गायब

बोटा स्वस्त धान्य दुकानातील 7 हजार 855 किलो धान्य गायब

संगमनेरच्या पुरवठा अधिकार्‍यांनी घेतली दुकानाची झाडाझडती

घारगाव |वार्ताहर| Ghargav

अंत्योदय आणि प्राधान्य गटातील गोरगरिबांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण केले जात असताना संगमनेर तालुक्यातील बोटा येथे स्वस्त धान्य दुकानामधील शिल्लक असलेल्या धान्यसाठ्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीचे सचिव सचिन आहेर व अध्यक्ष सुखदेव शेळके यांनी बुधवार दि. 12 जून रोजी संशयावरून धान्य दुकानातील शिल्लक साठ्याची पडताळणी केली. यावेळी दुकानातील 7 हजार 855 किलो धान्य गायब असल्याचे लक्षात आल्याने याबाबत सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी पुरवठा अधिकार्‍यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रविवारी (दि. 16 जून) दिवसभर पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनी दुकानाची झाडाझडती घेतली.

- Advertisement -

बोट्याच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव सचिन आहेर व अध्यक्ष सुखदेव शेळके यांनी संशयावरून बुधवारी धान्य दुकानातील शिल्लक साठ्याची पडताळणी केली. त्यांच्या पडताळणीत सदरील धान्य दुकानात 3 हजार 203 किलो गहू व 4 हजार 652 किलो तांदूळ शिल्लक दिसत असताना प्रत्यक्षात मात्र तो कोठेही आढळून आला नाही. याबाबत त्यांनी दुकानातील मदतनीस सौरभ शेळके याच्याकडे विचारणा केली असता त्याने सदरील मालाची पूर्तता करून देण्याचे त्यांना आश्वासन दिले. मात्र नोंदवहीत शिल्लक साठा दिसत असताना प्रत्यक्षात जवळपास 7 हजार 855 किलो धान्य गेले कोठे याचे उत्तर मात्र त्याला देता आले नाही. यावेळी सोसायटीचे सचिव व अध्यक्ष यांनी इतर संचालकांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी शिल्लक साठ्याचा पंचनामा केला. मदतनिस सौरभ शेळके याने गायब मालाची पूर्तता करण्याची हमी लिहून दिल्याने त्याला दोन दिवसांचा वेळ देण्यात आला.

15 जून रोजी मालाची पूर्तता न झाल्याने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी पुरवठा अधिकार्‍यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. अन्नधान्याची तफावत निदर्शनास आणल्यानंतर संबंधिताने अन्य काही दुकानदारांशी संपर्क करून तात्पुरता धान्यसाठा देण्याची विनंती केली, मात्र कोणीही मदत केली नाही. दरम्यान रविवारी सुट्टी असतानाही पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनी बोटा गाठत दुकानाची झाडाझडती घेतली. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिल्लक मालाचा पंचनामा करण्यात आला असून मदतनिस सौरभ शेळके यांना आपले म्हणणे देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचे पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हजारो किलो धान्यावर डल्ला..
बोटा सोसायटी येथे बोटा गावासह माळवाडी, तळपेवाडी, कुरकुटवाडी यांचे धान्य वाटप केले जाते. अंदाजे 700 रेशनकार्डधारकांना महिन्याला रेशन वाटले जाते. धान्य दुकान शासकीय सुट्टी वगळता रोज उघडे ठेवणे गरजेचे असताना मदतनिस यांच्या वेळेनुसार उघडे ठेवले जात होते. गेली काही वर्षे अनेकांच्या फक्त मशिनमधून चिठ्ठ्या काढल्या, शासनाकडून धान्य कमी आले अशी सबब देत धान्य कमी दिले. अनेक रेशनकार्डधारकांना मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या फक्त चिठ्ठ्या दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात धान्य मिळालेच नसल्याचे रेशनकार्डधारकांचे म्हणणे आहे. यावरून धान्य दुकानातून हजारो किलो धान्यावर डल्ला मारल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या