Friday, May 3, 2024
Homeनगरएकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळीबार स्वतःचाही आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळीबार स्वतःचाही आत्महत्येचा प्रयत्न

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

लग्नास नकार देणार्‍या तरुणीवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. ही घटना काल मंगळवारी पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास येथील भंडारी वसाहतीच्या पाठीमागे असणार्‍या अंबिकानगर भागात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसर अक्षरशः हादरून गेला आहे.

तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून त्याच्यासोबत असलेला एक तरुण तेथून पसार झाला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात त्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार विकी तथा विक्रम रमेश मुसमाडे (वय 28 वर्ष, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व अन्य अज्ञात तरुण या दोघांविरूद्ध गुरनं. व कलम 1277/2020 भादंवि. कलम 307, 452, 34 आर्म अ‍ॅक्ट 3, 7, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकी मुसमाडे याने एका 24 वर्षाच्या फिर्यादी तरुणीवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी प्रसंगावधान दाखवून तरुणीच्या आजीने तिला बाजूला ढकलून दिल्याने गोळी तिच्या डोक्याला घासून गेल्याने सुदैवाने ती यातून बचावली. त्यानंतर त्या तरुणाने स्वतःवर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

गोळी सरळ मेंदूतून आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊ पाहणी करुन पंचनामा केला. तरुणाच्या खिशातील मोबाईल, घटनास्थळी पडलेला गावठी कट्टा व दोन गोळ्या व त्याच्या पोंगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

तर काल सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तरूणासोबत आलेल्या तरूणालाही ताब्यात घेण्यात आले असून मुसमाडे याने ज्यांच्याकडून गावठी कट्टा विकत घेतले, त्या दोन तरूणांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.

येथील अंबिकानगर भागात राहणारी एक तरुणी आई, वडील मयत झाल्याने आपल्या दोन बहिणींसह आजीसोबत राहते. सध्या ती तरुणी बी.ई.सिव्हीलच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. नुकतीच तिने अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे. गेल्या दोन वर्षापासून मुसमाडे हा एकतर्फी प्रेमातून तिला त्रास देत असल्याची माहिती त्या तरूणीच्या नातेवाईकांनी दिली.

काल मंगळवार दि. 15 सप्टेंबर रोजी पहाटे 5.45 वाजता मुसमाडे हा तरुणीच्या घराच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन त्या तरुणीच्या स्वयंपाक खोलीत आला. यावेळी त्याच्यासोबत आणखी एक तरुण होता. परंतु तो बाहेरच थांबला होता. पहाटे साडेपाच वाजता नळाला पाणी येत असल्याने त्या तरुणीची आजी पाणी भरण्यासाठी उठली होती. त्याचवेळी घरात शिरून विकीने घरात असलेल्या तरूणीवर गावठी कट्टा रोखून, ‘बोल तू माझ्याबरोबर लग्न करणार की नाही?’ असा सवाल करून तिच्यावर पिस्तूल रोखले.

समोर असलेली गंभीर परिस्थिती पाहून भांबावलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने नकार देताच त्याने तिच्यावर गोळी झाडली. मात्र, प्रसंगावधान राखून आजीने त्या तरुणीला जोरात बाजूला ढकलून दिल्याने गोळी तिच्या डोक्याला चाटून गेली व ती तरुणी भिंतीवर आपटली. ती पडल्याचे बघून विकीने स्वतः वर गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने तो जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडला.

या घटनेनंतर आरडा ओरडा झाल्याने शेजारी मदतीसाठी धावले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी मदतीसाठी इतरांना बोलाविले. या घटनेची माहिती त्या तरुणीच्या लहान बहिणीने आपल्या चुलत्याला दिली. घटनेची माहिती समजताच दत्ता कडू, नगराध्यक्ष सत्यजित कदम, डॉ. संदीप मुसमाडे, अनंत कदम, डॉ. विश्वास पाटील आदी दाखल झाले. नगराध्यक्ष कदम यांनी तातडीने पोलीस यंत्रणेला पाचारण केले.

रुग्णवाहिका बोलावून त्या तरुणीला राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून तिच्या डोक्याला चार टाके पडले असून उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. तर गंभीर अवस्थेत असलेल्या मुसमाडे यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान, विकी याने घटनेत वापरलेला गावठी कट्टा कोणाकडून घेतला? याचा छडा पोलिसांनी लावला. विकीसोबत आलेल्या त्या तरूणाने गावठी कट्टयाच्या व्यवहाराची खडान्खडा माहिती पोलिसांना दिली. सोमवारी विकी याने गळनिंब येथील दोन तरूणांकडून 35 हजार रुपयांना हा गावठी कट्टा विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्या दोन तरूणांना राहुरी पोलिसांनी गजाआड केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या